‘हॉटेल सुरु झाली, आता पर्यटनस्थळे खुली करा’

2Sakal_20News_11
2Sakal_20News_11

औरंगाबाद : राज्यभरातील हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट सोमवारपासून (ता.५) सुरु झाले आहेत. खवय्यांना थेट हॉटेलात जाऊन आवडते पदार्थ खाण्याचा आनंद घेता येत आहे. सर्वकाही अनलॉक होत असताना जिल्ह्यातील पर्यटनस्थळे हळूहळू काही नियम ठरवत खुली करावीत, अशी मागणी पर्यटनप्रेमी व यावर अवलंबून असलेल्यांतर्फे करण्यात येत आहेत.

पर्यटनस्थळे सुरु करण्यासाठी औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरमने पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला असून १५ ऑक्टोबरनंतर यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे श्री. ठाकरे यांनी आश्‍वासन दिल्याचे फोरमचे अध्यक्ष जसवंतसिंग राजपूत यांनी ‘सकाळ’ला सांगितले. सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद आहेत. यावर अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, गाईड, टूर ट्रॅव्हल्स यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

याविषयी मराठावाडा मुक्ती संग्रामदिनानिमित्त शहरात आलेले पालकमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेत औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरम, औरंगाबाद फर्स्ट व हॉटेल चालकांनी पर्यटनस्थळे सुरु करण्याची मागणी केली होती. त्यावर याविषयी सरकार सकारात्मक असून लवकरच या विषयी निर्णय होणार असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले होते. त्यानंतरही पर्यटनस्थळ सुरु झालेले नाहीत. आता हॉटेल सुरु झाले आहेत.

यातील ५० टक्के हॉटेल्सचा व्यवसाय पर्यटनावर अवलंबुन आहे. यामुळे ताजमहलसाठी पर्यटकांना जी नियमावली लावली आहे, तशीच नियमावली लावत जिल्ह्यातील अजिंठा-वेरुळ लेणी, बिबिका मकबरा, सर्व पर्यटनस्थळे सुरु करण्यात यावीत, अशी मागणीही करण्यात येत आहे. पर्यटनमंत्र्यांनी १५ ऑक्टोबरपर्यंतचा अवधी दिला असल्यामुळे तोपर्यंत आम्ही वाट पाहणार असल्याचेही जसवंतसिंग राजपूत यांनी सांगितले.


‘परत एकदा चला पर्यटनाला’
लॉकडाउनमुळे सहा महिन्यांहून अधिक काळापासून पर्यटनक्षेत्रे बंद आहेत. यामुळे यावर अवलंबून असलेल्यांचे मोठे हाल झाले. आता अनलॉकच्या माध्यमातून देशातील काही राज्यांतील पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहेत. यामुळे हळूहळू पर्यटक घराबाहेर पडू लागला आहे. पर्यटनाला चालना मिळण्यासाठी ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ औरंगाबादतर्फे ‘परत एकदा चला पर्यटनाला’ या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यटनाचा थांबलेला गाडा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे.


पर्यटन स्थळे सुरु करण्याविषयी गेल्या आठवड्यात पर्यटनमंत्र्यांची भेट घेतली असून त्यांनी याविषयी सकारात्मक प्रतिसाद दिला. पंधरा ऑक्टोबरपासून कदाचित पर्यटनस्थळे सुरु होण्याची शक्यता आहे.
- जसवंतसिंग राजपूत, अध्यक्ष, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरम

संपादन - गणेश पिटेकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com