
औरंगाबाद - दरवर्षी शाळा, महाविद्यालयांत मोठ्या उत्साहात स्नेहसंमेलन भरविले जाते; मात्र काही शाळांमध्ये स्नेहसंमेलनाचा मूळ उद्देश बाजूला सारून या स्तुत्य उपक्रमाला बाजारीकरणाचे स्वरूप आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली पालकांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क वसूल केले जाते; पण मुलांच्या भविष्यासाठी शाळेविरोधात पालक बोलायला तयार होत नसल्याने चित्र आहे.
मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून शाळा, महाविद्यालयांत स्नेहसंमेलन भरविले जातात. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना कलेचे व्यासपीठ मिळते; मात्र स्नेहसंमेलनांच्या मूळ संकल्पनेचे सध्या बाजारीकरण झाले आहे. विद्यार्थ्यांना या अभासी दुनियेत नेऊन मुलांसोबतच पालकांचीही फसवणूक केली जाते. शहरातील काही शाळांनी तर याचा धंदा मांडला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांपेक्षा इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये हे "फॅड' आहे.
कमाईचे साधन
एखाद्या विद्यार्थ्याने स्नेहसंमेलनात भाग घेतला, तर त्याला नृत्य शिकावे लागते. नृत्य शिकवण्यासाठी कोरिओग्राफर, डान्सर, शाळेकडून ठरलेले असतात. मनमानी शुल्क आकारून कोरिओग्राफर मुलांना नृत्य शिकवतात. या शुल्कामध्ये शाळेचाही वाटा असतो. स्नेहसंमेलनासाठी लागणारा पोशाख, अन्य साहित्य काही शाळा स्वतः खरेदी करतात; काही शाळा स्वतः पुरवितात. त्याचे शुल्क किंवा कमिशन काढले जाते.
स्नेहसंमेलन हे शाळेच्या मैदानावर घेणे अपेक्षित असते; मात्र झगमगत्या चंदेरी दुनियेसाठी अवाच्या सव्वा भाडे देऊन हे स्नेहसंमेलन नाट्यगृहात घेतले जाते. या नाट्यगृहाचे भाडेही पालकांच्या खिशातून काढले जाते. या स्नेहसंमेलनातून शाळेला मोठ्या प्रमाणात नफा तर मिळतोच शिवाय शाळेला प्रसिद्धीही मिळते.
स्नेहसंमेलनातील "बिझनेस फंडा'
इतर शाळांच्या तुलनेत आपल्या शाळेचे स्नेहसंमेलन चांगले कसे होईल, यासाठी मूळ हेतूला फाटा देत भपकेबाज कार्यक्रम केले जातात. त्यासाठी चित्रपट अभिनय, नृत्य क्षेत्रातील छोटेमोठे सेलिब्रिटी बोलवले जातात. नृत्य व अभिनयाचा दिखावा केला जातो. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य, अभिनयाचे फोटो, व्हिडिओ शूटिंगची पालकांना विक्री करून त्यातूनही मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल केली जाते. त्यामुळे अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसत आहे.
-
खर्च शाळांनी करणे अपेक्षित
स्नेहसंमेलन शाळेच्या मैदानावर न घेता अनेक शाळा स्नेहसंमेलन नाट्यगृहात घेतात. या नाट्यगृहाचा खर्च पालकांच्या खिशातून काढला जातो. म्हणून किमान हा खर्च शाळांनी करावा.
शिक्षणाधिकारी म्हणतात...
याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, की अद्याप कोणत्याही पालकांनी याबाबत तक्रार केलेली नाही. शिवाय पालकांनी ज्यावेळी विद्यार्थ्यांचा इंग्रजी शाळेत प्रवेश घेतलेला असतो, तेव्हा त्याने शाळेच्या सगळ्या अटी मान्य असल्याचे लिहून दिलेले असते. त्यामुळे पालकांनी मुलांचे प्रवेश अशा शाळेत घेऊच नाही. खासगी इंग्रजी शाळेकडून मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे माहिती असूनही पालक मुलांचे प्रवेश अशा शाळेत करतात. त्यामुळे स्नेहसंमेलनासाठी शाळा पालकांकडून मनमानी पद्धतीने शुल्क घेतात असे पालकांचे म्हणणे खेदजनक आहे, अशी शोकांतिका त्यांनी व्यक्त केली.
शाळेची फी, वह्या, पाठ्यपुस्तके त्यानंतर आता स्नेहसंमेलनासाठीही पालकांनाच टार्गेट केले जाते. यावर शिक्षण विभागाचे नियंत्रण नसल्यामुळे या शाळांचे फावले जात आहे. हौशी पालकांकडून खर्च केला जातो; मात्र आरटीईअंतर्गत प्रवेश घेतलेल्या पालकांची मात्र फरपट होते. त्यावर शिक्षण विभागाने नियंत्रण ठेवावे.
- शाहिनबानो शेख, पालक.