HSC Result खंरच आज आई असायला हवी होती...

संदीप लांडगे
Friday, 17 July 2020

आई हे नाव नसतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. जेव्हा हे गाव हरपलं जातं तेव्हा नातेवाईक, सगेसोयरे कोणीही जवळ करत नाही. हेच या दोघा बहिण भावांच्या बाबतीतही घडलं.

औरंगाबाद ः ‘‘जर आज आई जिवंत असती, तर तिने मला घट्ट मिठी मारली असती व सगळ्यांना पेढे वाटत फिरली असती...’’ अनुरक्षणगृहात राहून मोठ्या कष्टाने बारावीत चांगले यश मिळविलेल्या किरणच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या अन् तो बोलत होता. 

शासकीय मुलांच्या अनुरक्षणगृहातील किरण चौरे (७६.३०) या विद्यार्थ्याने बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. याबद्दल अनुरक्षणगृहाचे अधीक्षक बी. एच. नागरगोजे यांनी अभिनंदन केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असणाऱ्या किरणची कहाणी अत्यंत हृदयद्रावक आहे. जालना येथे राहणाऱ्या किरणचे वडील लहानपणीच त्यांना सोडून गेले होते. त्यानंतर आईनेच किरण व त्याच्या बहिणीचा सांभाळ केला. पती सोडून गेल्यामुळे आई जीवनात खचून गेली होती; पण मुलांसाठी लोकांची धुणीभांडी करून संसाराचा गाडा ती हाकत राहीली.  मुलांनी खूप शिकावं अशी त्या माऊलीची इच्छा होती; पण २०१५ मध्ये तीनेही या जगाचा निरोप घेतला. अन् छत्र हरवल्याने दोघा बहीण-भावाच्या जीवनाची वाताहत सुरू झाली.

हे ही वाचा -  शाळांच्या अनुदानाची वाट मोकळी  
 
आई हे नाव नसतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. जेव्हा हे गाव हरपलं जातं तेव्हा नातेवाईक, सगेसोयरे कोणीही जवळ करत नाही. हेच या दोघा बहिण भावांच्या बाबतीतही घडलं. खरं तर आई गेल्यावर या लहान मुलांना आधाराची गरज होती. मात्र, यावेळी नातेवाइकांनीही त्यांना आधार दिला नाही. त्यामुळे उपाशीपोटी त्यांची भटकंती सुरू झाली. त्यानंतर किरणने मिळेल ते काम करून बहिणीला शिकवण्यासाठी धडपड सुरू केली. कधी उपाशी तर कधी मिळेल ते खावून दोघांचे जगणे सुरू होते. 

शिकण्याची खूप इच्छा असूनही शिक्षण घेता येत नसल्याची खंत किरणला स्वस्थ बसू देत नव्हती. किरणने एका मित्राच्या मदतीने औरंगाबादेत एका रिमांड होममध्ये राहून पुढील शिक्षण सुरू केले. तर धाकट्या बहिणीलाही विद्यादीप बालगृहात ठेवले. त्याची शिक्षणाची जिद्द पाहून पदमपुरा भागातील अनुरक्षणगृहाच्या अधीक्षकांनी विवेकानंद महाविद्यालयात प्रवेश घेऊन दिला. मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी किरणने रात्रंदिवस अभ्यास करून बारावीच्या परीक्षेत ७६.३० टक्के मिळवले आहेत. 

वाचा...  विनाअनुदान शाळांना मिळणार अनुदान    

शिकण्याची जिद्द 
किरणने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले, की मी खूप शिकावं, मोठं व्हावं असं माझ्या आईचं स्वप्न होतं; पण घरात अठराविश्व दारिद्र्य असल्यामुळे शिकता येत नव्हतं. मोलमजुरी करता करता आईने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे बहिणीची जबाबदारी माझ्यावर आली. अनाथालयात राहून आम्ही दोघंही शिक्षण घेत आहोत. आज बारावीला मी ७६.३० टक्क्यांनी उत्तीर्ण झालो आहे. पण माझं हे यश पाहाण्यासाठी आज आई जिवंत नाही... ती जर आज जिवंत असती तर... मला घट्ट मिठी मारली असती, मला कुठे ठेवू अन् कुठे नको... असं तीला झालं असतं. तीचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी  यापुढेही शिकण्याची जिद्द आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HSC Result If Mother was Alive She Would Have Given a Hug Aurangabad