पॅंडेमिकच्या निमित्ताने मराठवाड्यातील आरोग्य सुविधा वाढविण्याची संधी

मनोज साखरे
Thursday, 17 September 2020

आयएमएचे अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सकाळशी संवाद साधला. यात मराठवाड्यातील आरोग्य सुविधांबाबत असलेले आवाहन आणि कोरोनाच्या काळात झालेले बदल यावर आपली भूमिका मांडली आहे. 

‘‘मराठवाड्यातील इतर ठिकाणी उपलब्ध सुविधा पुरेशा नसताना. त्यामुळे रुग्णांना पुढील उपचारासाठी औरंगाबादेतच यावे लागते. पॅंडेमिकमुळे महाराष्ट्रातील आरोग्यसेवा ग्रामीण भागात व्यापक रुपात राबविल्या जात आहेत. ग्रामीण भागातही स्क्रिनिंग होत आहे. असिम्थेमॅटीक रुग्णांचे उपचार ग्रामीण भागातच होत आहेत. ग्रामीण भागातील त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे. औषधांचा तूटवडा होणार नाही याकडे लक्ष दिले जात आहेत. या गोष्टी मराठवाड्यातील भविष्यातील आरोग्यसेवा व सुविधा भक्कम करण्यासाठी अत्यंत सकारात्मक आहेत.’’ असे मत ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर यांचे आहे. 

पाचोड, कन्नड, सिल्लोडसह मराठवाड्यात ठिकठिकाणी ट्रामा सेंटर उभारण्यात आले आहेत. नियमित स्वरुपात अस्थिरोग तज्ज्ञांचीही निवड करण्यात आली आहे. या दृष्टीने आरोग्य सुविधांत वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कोवीडच्या धर्तीवर आता या गोष्टींना जास्त बळकटी मिळेल. बजेटमध्येही आरोग्यासाठी मोठ्या तरतूदी केल्या जात आहेत. त्यामुळे आरोग्य सेक्टर दुर्लक्षित राहीले नाही. 

शासनाच्या नविन निर्णयानुसार नविन वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जालना, परभणी, बीड अशा ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु झाली की, डॉक्टरांची संख्या वाढेल व सुविधा स्थानिक पातळीवर निर्माण होतील. पॅंडेमिक हे निमित्त आहे. त्यामुळे मराठवाड्यातील आरोग्य सुविधा वाढण्यास मोठी मदत मिळेल. मराठवाडा दुर्लक्षित होणार नाही. मराठवाड्यात बरेचशा समस्या येथील वातावरणामुळे आहेत. 

फार्मा इंडस्ट्रीजसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा औरंगाबादेत आहेत. कोणत्याही इंडस्ट्रीज वाढण्यासाठी कॉरीडॉर वाढायला हवा. पाणी, मनुष्यबळ व कनेक्टीव्हीटी व इन्फ्रास्ट्रक्चरची गरज असते औरंगाबादेत या सुविधा व गुणवत्ता आहेत. त्यामुळे येथे फार्मा इंडस्ट्रीज वाढली व अजुनही चांगले पोषक वातावरण आहे. राजकीय पुढाकार मिळाला तर औरंगाबाद मेडीकल हब होईल. 

या गोष्टी आवश्‍यक, होईल रुग्णांचा फायदा -  

  • कनेक्टीव्हीटी वाढायला हवी. 
  • या माध्यमातून ग्रामीण भाग जिल्ह्याशी जोडला जावा. 
  • शहरात येणाऱ्या रुग्णांना अडथळे व्हायला नको. 
  • दळणवळणाच्या सुविधा वाढाव्यात. 
  • प्रायमरी केअर केले जातात अर्थात उपचार केले जातात त्या ठिकाणी सेटअप्समध्ये सुधारणा व्हाव्यात. 
  • छोट्या-छोट्या गोष्टींसाठी रुग्णांना शहरात येण्याची गरज पडायला नको, आरोग्य सुविधा तेथेच मिळाव्यात. 
  • कन्सलटंट डॉक्टर्स, तज्ज्ञ डॉक्टरांनी खेड्यात सेवा द्यायला सुरुवात करायला हवी. 
  • टेलीमेडीसीन तंत्राचा अधिक वापर व्हायला हवा. त्यातून रुग्ण डॉक्टरांना वेदना सांगु शकतो, मार्गदर्शन घेऊ शकतो. 
  • ट्रेनिंग, वर्कशॉप, कॉन्फरन्समध्ये वाढ व्हायला हवी, त्यातुन तंत्र, ज्ञानाचे आदानप्रदान होईल. 

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IMA President Dr. Santosh Ranjalkar Opinion on health in Marathwada