इथे तरी विलंब नको! मृत व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल तत्काळ देण्याची गरज

मनोज साखरे
Tuesday, 6 October 2020

पण रुग्ण दगावतो, रुग्ण कोरोना संशयित असल्यास चाचणी होते.

औरंगाबाद : प्रकृती गंभीर झालेल्या आजाराने ग्रस्त रुग्ण वाचावा म्हणून नातेवाईक लाख प्रयत्न करतात. पण रुग्ण दगावतो, रुग्ण कोरोना संशयित असल्यास चाचणी होते. अहवालाशिवाय मृतदेह नातेवाईकांना दिला जात नाही, पण रिपोर्टच चोवीस तास व त्यापेक्षा उशिराने येत असल्याने विरह आणि वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो. त्यातच साऱ्या प्रक्रीया आणि मानसिक त्रासही होत असल्याने किमान चाचणी अहवाल तात्काळ मिळाला तर नातेवाईकांची ससेहोलपट थांबेल. त्यामुळे मृत व्यक्तीचे कोरोना चाचणी अहवाल प्रक्रीया जलद होण्याची गरज आहे.

हॉटेलचालकांना पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद, वेळ वाढवून देण्याची मागणी

दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती अथवा उच्च रक्तदाब, हृदयविकार व इतर व्याधीने ग्रस्त रुग्णांवर रुग्णालयात उपचार केले जातात. कोरोना संशयित वाटत असल्याचे त्यांची चाचणीही केली जाते. मात्र, कोरोना चाचणीचे नमुने प्रयोगशाळेत तात्काळ पाठविले जातातच असे होत नाही. याशिवाय कोरोना संशयित मृत रुग्णाचेही कोरोना चाचणीसाठी नमुने घेतले जातात. रुग्णालयातून नमुने उशिरा गेल्यास प्रयोगशाळेतही विलंब होतो. चोवीस तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ चाचणी अहवालासाठी लागतो. या दरम्यान मृतदेह नातेवाईकांकडे सोपविला जात नाही. जीवलग गेल्याचा विरह व त्रास नातेवाईकांना होतो. त्यात गेलेल्या व्यक्तीचा साधा चेहराही पाहता येत नाही. यादरम्यान मृतदेह विघटीत होण्यास सुरुवात होते.

अशा आहेत अडचणी
- चाचणीचा अहवाल विलंबाने येत असल्याने मृतदेहासाठी चोवीस तास वेटींग करावी लागते.
- बाहेरगावच्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास सोबतच्या एकट्या नातेवाईकावर येतो भार.
- खासगी रुग्‍णालयांकडून नातेवाईकांना फारसे सहकार्य होत नाही.
- नमुने चाचणी व अहवाल प्रक्रीयेबाबत माहितीही नातेवाईकांना दिली जात नाही.
- चोवीस तासानंतर आलेल्या अहवालात मृत रुग्ण निगेटीव्ह असल्यास गावी नेण्यासाठीचा वेगळा अवधी लागतो.
- सुरुवातीचीच प्रक्रिया विलंबाने झाल्यास अंत्यविधीलाही विलंब. दरम्यान मृतदेहाला दुर्गंधी सुटल्याचे प्रकारही होतात.

कोरोना उपचारासाठी आठशे खाटांची वाढ, रेमडेसीवीरचे तीन हजार आठ इंजेक्शन उपलब्ध

हव्यात सुधारणा
- आजाराने ग्रस्त व चाचणी आवश्‍यक असलेल्या रुग्णाचे तात्काळ नमुने घ्यावेत.
- ते नमुने प्रयोगशाळेतही तितक्याच जलदपणे पाठविणे आवश्‍यक.
- एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास नंतर होणाऱ्या कोरोना चाचण्याची वेगात राबवावी.
- त्याचा अहवालही प्रयोगशाळेकडून तात्काळ द्यायला हवा.
- मृत्यूपुर्वी अथवा नंतर घेण्यात येणाऱ्या चाचण्यांच्या अहवालाचा ठराविक अवधी ठरवा.
-काही तासांतच रिपोर्ट मिळावेत, प्राधान्यक्रमही ठरवावा.

 

घाटी रुग्णालयात मृत झालेला रुग्ण कोरोना संशयित असल्यास त्याची कोरोना चाचणी केली जाते. या चाचणीचा अहवाल साधारणतः चोवीस तासात येतो. तो लवकरात लवकर कसा मिळेल यावर काम करु.
-डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकिय वैद्यकीय महाविद्यालय
 

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Immediate Give Dead Person Corona Test Report Aurangabad News