esakal | कोविड केंद्राला लावले कुलूप, कोरोनाच्या २२ रुग्णांचे रात्रभर झाले हाल
sakal

बोलून बातमी शोधा

Jarandi Covid Centre

जरंडी (ता.सोयगाव) येथील कोविड केंद्र रविवारी (ता.२३) तालुका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी चक्क वाऱ्यावर सोडले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शनिवारी (ता.२२) रात्री कोविड केंद्राला कुलूप लावण्यात आले होते. यामुळे केंद्रातील २२ रुग्णांना पिण्याच्या पाण्यासह इतर सुविधा मिळू शकल्या नाहीत.

कोविड केंद्राला लावले कुलूप, कोरोनाच्या २२ रुग्णांचे रात्रभर झाले हाल

sakal_logo
By
यादवकुमार शिंदे

जरंडी (जि.औरंगाबाद) - जरंडी (ता.सोयगाव) येथील कोविड केंद्र रविवारी (ता.२३) तालुका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी चक्क वाऱ्यावर सोडले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शनिवारी (ता.२२) रात्री कोविड केंद्राला कुलूप लावण्यात आले होते. यामुळे केंद्रातील २२ रुग्णांना पिण्याच्या पाण्यासह इतर सुविधा मिळू शकल्या नाहीत. अखेरीस रविवारी दुपारी उशिरा सफाई कर्मचाऱ्याने चावी आणल्याने दुपारी कोविड केंद्र उघडण्यात आले. त्यामुळे रुग्णांनी मोकळा श्वास घेतला.

आयशर टेम्पोने दिली दुचाकीला धडक, अपघातात एकजण ठार

जरंडी कोविड केंद्रात समन्वयक अधिकाऱ्यासह महसूल विभागाचे कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. मात्र रविवार असल्याने या कोविड केंद्राच्या परिसरात नियुक्त करण्यात आलेला एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे केवळ दोन गृहरक्षक दलाच्या जवानांवर रविवारी कोविड रुग्णांची सुरक्षा होती. कोविड केंद्राला शनिवारी रात्री लावण्यात आलेले कुलूप रविवारी कायम असल्याने दुपारपर्यंत रुग्णांना पाण्याविना आणि कर्मचारीच नसल्याने औषधाविना राहावे लागले होते. शनिवारीही दुपारपर्यंत कोविड केंद्रात एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचे शनिवारी सुटी झालेल्या कोरोनामुक्त रुग्णांनी सांगितले.

शनिवारी सुटी झालेल्या रुग्णांना औषधाविनाच बाहेर पडावे लागले होते. दरम्यान शनिवारी रात्री लावलेले कुलुप कोविड केंद्राची रविवारीही दुपारपर्यंत स्थिती कायम राहिली होती. दुपारी उशिरा आलेल्या सफाई कर्मचाऱ्याने तातडीने कोविड केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराची चावी आणल्यावर केंद्र उघडण्यात आले होते. लाखो रुपये खर्च करण्यात येत असलेल्या या जरंडी कोविड केंद्रांवर गैरसोयी वाढल्या असल्याचे थेट रुग्णांकडून सांगण्यात येत आहे. या रुग्णांना वापरण्यासाठी तकलादू मास्क देण्यात येवून याच मास्कवर दोन-दोन दिवस काढावे लागत आहे. शासनाने या कोविडसाठी लाखो रुपये निधी उपलब्ध करून दिला असून रुग्णांसाठी खरेदी मंदावली आहे.


कोविड केंद्राच्या सुरक्षेसाठी कुलूप लावण्यात येते. नवख्या व्यक्तींना या ठिकाणी प्रवेशबंदी करण्यात आली असून आतील रुग्ण बाहेर पडू नये. यासाठी कुलूप लावण्यात येत आहे. रविवारी कदाचित चावी दुसऱ्या व्यक्तीकडे असेल त्यामुळे विलंब झाला.
- डॉ.श्रीनिवास सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी, सोयगाव

 

(संपादन - गणेश पिटेकर)

go to top