औरंगाबादच्या जैन इंटरनॅशनल स्कूलची मनसेकडून तोडफोड

संदीप लांडगे
Thursday, 15 October 2020

शाळेकडून घेतले जाणारे अवाजवी शुल्क, ते भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकणे, शुल्क न भरल्यास ऑनलाइन चाचणीची लिंक न देणे असे प्रकार करणाऱ्या जैन इंटरनॅशनल शाळेत सुरु होते.

औरंगाबाद : शाळेकडून घेतले जाणारे अवाजवी शुल्क, ते भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकणे, शुल्क न भरल्यास ऑनलाइन चाचणीची लिंक न देणे असे प्रकार करणाऱ्या जैन इंटरनॅशनल शाळेत सुरु होते. या विरोधात पालकांनी शिक्षण विभागात देखील तक्रार केली होती. शाळेच्या मनमानी कारभाराविरुद्ध मनसेतर्फे देखील शिक्षण विभागात निवेदन देण्यात आले होते. मात्र, शिक्षण विभागातून याबाबत कार्यवाहीसाठी विलंब लागत होता. शाळेकडून पालकांवर दबाव टाकणे सुरुच होते, याविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेत गुरुवारी (ता.१५) शाळेची तोडफोड केली. 
 
 
कोरोना लॉकडाउनमुळे पालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत शाळेकडून पालकांना विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क भरण्यासाठी दबाव टाकला जात आहे. शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाइन चाचणीची लिंक न देणे, पालकांवर दबाव टाकणे, अशी अडवणूक केली जात आहे. शाळा बंद असताना, विद्यार्थी शाळेत जात नसताना मार्च, एप्रिल, मेसह पूर्ण वर्षाचे शाळा शुल्क, बसभाडे, परीक्षा, भोजनाचे शुल्क पालकांना शाळेकडून मागितले जात होते. आपल्या पाल्याचा दाखला काढून घ्या, अन्यथा आम्ही शाळेतून काढून टाकू, असा दमच दिला जात असल्याचा आरोप पालकांनी केला होता. शाळेच्या मनमानीविरोधात शिक्षण विभागाकडून देखील ठोस असे पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे शाळांकडून दमदाटी सुरू असल्याचा आरोप पालकांकडून केला जात होता.
 
शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासपासून वंचित ठेवणे, शुल्क भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकणे, या कारणांवरून जैन इंटरनॅशनल शाळेच्या प्राचार्यांना मंगळवारी (ता. सहा) पालकांनी घेराव घातल्याची घटना घडली होती. विद्यार्थ्यांना ऑनलाईन घटक चाचणी परीक्षेची लिंक न पाठवत परीक्षेपासून तसेच क्लासपासून वंचित ठेवत शिक्षण अधिकार कायद्याचे उल्लंघन शाळेकडून झाले आहे. या कायद्यानुसार शाळेवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून करण्यात आली. याबाबत उपशिक्षणाधिकारी अश्‍विनी लाटकर यांना निवेदन दिले होते.
 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Navnirman Sena Vandalised Jain International School Aurangabad News