esakal | आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सरकारविरुध्द बोंबाबोंब आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Bonbabom Andolan

औरंगाबाज जिल्ह्यातील पैठण येथे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी(ता.२१) बोंबाबोंब आंदोलन केले.

आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सरकारविरुध्द बोंबाबोंब आंदोलन

sakal_logo
By
चंद्रकांत तारु

पैठण (जि.औरंगाबाद) : मराठा समाजाचे आरक्षण पूर्ववत ठेवण्यात यावे, अशी मागणी करुन मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पैठण येथे सोमवारी (ता.२१) सरकारविरुध्द बोंबाबोंब आंदोलन केले. या आंदोलनात तालुक्यातील समाज बांधवांनी उपस्थित राहुन उत्स्फूर्त पाठिंबा दिला. सकाळी अकराला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

या प्रसंगी बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे नेते अतिष गायकवाड यांनी सांगितले की, तब्बल तेरा वर्षांनंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागला. परंतु काही विघ्नसंतोषी लोकांमुळे आरक्षणाला स्थगिती मिळालेली आहे. ही स्थगिती केवळ सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे मिळाली आहे. त्यामुळे जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत अशीच आंदोलन सरकारविरुध्द केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

शाळा विकणे आहे, खरेदीदार मिळेल का? कोरोनाचा शिक्षण क्षेत्राला मोठा फटका

आंदोलन विविध राजकीय पक्षांचे व सामाजिक संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहुन पाठिंबा दर्शविला. दरम्यान, मराठा समाज आरक्षणावर दिलेली स्थगिती उठवावी, पोलिस भरती करु नये आदी मागण्यांसाठी सरकारच्या उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिष्टमंडळ भेटुन निवेदन देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यातर्फे शिवसेना युवा नेते विलास भुमरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी तहसिलदारांना आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

आरक्षणास स्थगितीबद्दल वेरूळ ते मुंबई पायी दिंडी
मराठा आरक्षणाबाबत नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीवरून मराठा समाजामध्ये तीव्र भावना उमटल्या असून, मराठा आरक्षणाच्या मागणीकडे पुनश्च सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खुलताबाद तालुका सकल मराठा समाजातर्फे शुक्रवारपासून (ता.२५) वेरूळ ते मंत्रालय, मुंबई अशा पायी दिंडीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले जयंती महोत्सव समिती तथा मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र पवार यांनी दिली.

कोरोना झाला? घाबरू नका!

खुलताबाद येथील जिल्हा परिषद विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना पवार यांनी सांगितले, की स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या गढीवरील माती चार कलशांमध्ये घेऊन सदरील दिंडी मार्गक्रमण करणार आहे. कोविड-१९ ची सर्व नियमावली पाळून सदरील दिंडीत मराठा क्रांती मोर्चाचे दोनशे जण सहभागी होणार आहेत. सदरील दिंडी शांततेच्या मार्गाचा अवलंब करीत १० दिवसांचा प्रवास करीत मुंबईला जाईल.

संपादन - गणेश पिटेकर