Corona Updates: मराठवाड्यात एकाच दिवशी तब्बल २ हजार १८१ रुग्ण, औरंगाबाद जिल्ह्यात ७२० जणांना कोरोना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwada Corona Updates

नवीन वर्ष सुरू झाले. २६ जानेवारीच्या मुहूर्तावर लॉकडाउनमध्ये सवलत दिली गेली. त्यामुळे कोरोनाची स्थिती आज ना उद्या सुधारेल असे अनेकांना वाटत होते.

Corona Updates: मराठवाड्यात एकाच दिवशी तब्बल २ हजार १८१ रुग्ण, औरंगाबाद जिल्ह्यात ७२० जणांना कोरोना

औरंगाबाद : महिनाभरापासून मराठवाड्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. शनिवारी (ता. १३) आठ जिल्ह्यांमध्ये एकूण २ हजार १८१ नव्या रुग्णांची भर पडली तर १५ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ७२०, नांदेड जिल्ह्यात ५९१ तर जालना जिल्ह्यात ४०० रुग्णांची नोंद झाली. नवीन वर्ष सुरू झाले. २६ जानेवारीच्या मुहूर्तावर लॉकडाउनमध्ये सवलत दिली गेली. त्यामुळे कोरोनाची स्थिती आज ना उद्या सुधारेल असे अनेकांना वाटत होते. दरम्यान, अनेकांनी मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे व सुरक्षित अंतर राखणे जणू सोडूनच दिले होते. त्याचा विपरित परिणाम आता दिसून येत आहे.


औरंगाबाद जिल्ह्यात ७२० नवे रुग्ण
औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी एकूण ७२० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली तर बरे झालेल्या ८४९ जणांना (मनपा ८०२, ग्रामीण ४७) रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान, आठ जणांचा मृत्यू झाला.

नांदेडमध्ये उच्चांक
नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ५९१ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर चार बाधितांचा मृत्यू झाला. आता नांदेड जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २६ हजार ३९१ इतकी झाली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये अरविंदनगर नांदेड येथील महिला (वय ५८), नांदेड येथील सन्मित्रनगरातील महिला (८९), शिवाजीनगर नांदेड येथील पुरुष (७६) आणि कलामंदिर नांदेड येथील पुरुषाचा (५५) समावेश आहे.

जालन्यात कोरोनाचे दोन बळी
जालना जिल्ह्यात शनिवारी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आत्तापर्यंत जिल्ह्यात ४१० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यातील ४०० नवीन कोरोनाबाधितांची भर पडली असून, ३६८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत १८ हजार ६९ कोरोना बाधितांपैकी १६ हजार ३२९ रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात एक हजार ३३० सक्रिय कोरोना बधितांवर उपचार सुरू आहेत.

बीडमध्ये १८१ रुग्ण
बीड जिल्ह्यात शनिवारी तब्बल १८१ कोरोना रुग्ण आढळले. यामध्ये बीड शहरातील ८२ रुग्णांचा समावेश आहे. आता जिल्ह्याची रुग्णसंख्या २० हजार १६७ झाली. आत्तापर्यंत १८ हजार ८४५ रुग्ण कोरोनामुक्त झालेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील ५८९ कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

परभणीत एकाचा मृत्यू
परभणी जिल्ह्यात दिवसभरात ४३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे उपचार घेणाऱ्यांची संख्या ३२७ झाली आहे. दिवसभरात एका रुग्णांचा मृत्यू झाला तर १४ जणांना बरे झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.

हिंगोलीत ६७ बाधित
हिंगोली जिल्ह्यात नवीन ६७ रुग्ण आढळून आले. दिवसभरात २८ बरे झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली. आजघडीला एकूण ४७० रुग्णांवर उपचार चालू आहेत. आत्तापर्यंत एकूण ६५ रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.

उस्मानाबाद, लातूरमध्येही रुग्ण वाढले
उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातीलही रुग्णसंख्या वाढत आहे. शनिवारी या दोन जिल्ह्यात कोरोनामुळे कुणाचा मृत्यू झाला नसला तरी उस्मानाबाद जिल्ह्यात ५४ तर लातूर जिल्ह्यात १२५ रुग्णांची भर पडली आहे.

Edited - Ganesh Pitekar

loading image
go to top