बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन होणार नाही, उच्च शिक्षणमंत्री सामंत यांचे स्पष्टीकरण

अतुल पाटील
Saturday, 19 September 2020

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन होणार नसल्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (ता.१९) सांगितले.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कष्टाने निर्माण झाले आहे. राज्य सरकारच्या नावाने विरोधक राजकारण करीत आहेत. उस्मानाबाद उपकेंद्र विद्यापीठापासून वेगळे करण्याचा कुठलाही हेतू नाही, असे स्पष्ट मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शनिवारी (ता.१९) ते पत्रकारांशी बोलत होते.

श्री.सामंत म्हणाले, विद्यापीठ विभाजनाचा मुद्दा पुढे करुन विरोधक वातावरण तापवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आंदोलकांनी आधी तो जीआर स्पष्टपणे वाचावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्र विकासासाठी ती समिती गठीत करण्यात आलेली आहे. ती समिती विभाजनासाठी नाही. विद्यापीठाची दोन भाग करण्याचा कुठलाही प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून होणार नाही. याबाबत विरोधकांच्या अफवेला कुणी बळी पडू नये.

उच्च शिक्षण मंत्र्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न, विद्यार्थी संघटनेच्या...

श्री.सामंत म्हणाले, मी परीक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी राज्यभर फिरत आहे. यादरम्यान, मंत्र्यांच्या गाडीसमोर काही संघटनांचे पदाधिकारी आडवे झोपत आहेत. निर्णय काही बाबतीत झालेले असतात, प्रामाणिक काम करणारे लोकांचे 'त्या' संघटनांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. घेतलेल्या निर्णयांची मागणी करण्याचे प्रकारही या संघटना करत आहेत. त्यांच्या निवेदनापुर्वीच काम केलेले असते. निवेदनाशिवाय निर्णय घेतो, म्हणून काहींना राग येतो. गाडी अडवून चार-पाच गुंड रस्त्यावर काठ्या घेऊन हल्ला करण्याच्या उद्देशाने समोर येतात. याबाबत, मी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही पत्र देणार आहे. याबाबत चौकशी करण्याची विनंती करणार आहे.

संतपीठ जानेवारीपासून सुरू होणार
पैठण येथे जगद्गुरु संत एकनाथ महाराज संतपीठ यासाठी इमारत तयार आहे. जानेवारी २०२१पासून हे संतपीठ शासन आणि विद्यापीठातर्फे सुरू करण्यात येणार आहे. महिन्याभरातच जीआर काढण्यात येईल. २२ कोटी खर्च येणार आहे. सुरवातीला हा खर्च विद्यापीठ करेल, तो पैसा नंतर शासनाकडून दिला जाईल. वारकऱ्यांच्या मागणीला मूर्त स्वरूप येत आहे. प्राध्यापकांच्या सातव्या वेतन आयोगाबाबत काही प्रलंबित प्रश्न पुढच्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत घेण्यात येतील, आमचे सरकार प्राध्यापकांसोबत असेल.

विजेच्या धक्क्याने चार जण भाजले, दुरुस्तीचे काम करताना घडली घटना

१६ हजार विद्यार्थी बसणार परीक्षेला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ऑफलाईन आणि ऑनलाईन परीक्षेसाठी एक लाख १६ हजार चारशे विद्यार्थी अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसणार आहेत. यात ३६ हजार २०८ बॅकलॉगचे विद्यार्थी आहेत. एक ऑक्टोबरला परिक्षेला सुरवात होणार असली तरी, १० ऑक्टोबरपासून निकाल लागण्यासाठी सुरवात होईल. ९० टक्के विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार असून दहा टक्के घराजवळच्या केंद्रात ऑफलाईन परीक्षा देतील. यासाठी महसूल विभागाने मदत करावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. काही ठिकाणी परीक्षा घेण्यास अडचण आली तर ती परीक्षा तातडीने एक महिन्यात पुन्हा घेण्यात येईल, विरोधक कोवीड पदवी म्हणून हिणवत असले तरी, गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांना पदवी मिळणार आहे. उद्योग आणि आस्थापनांनी २०२० मधील पदवी प्रमाणपत्राचाही आदर करावा, अन्यथा महाविकासआघाडी त्यांच्यावर कारवाई करेल. असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Dividesion Of Marathwada University, Said Higher Education Minister