प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची नावे गेली कोठे? आरटीई प्रवेशाचा गोंधळ

संदीप लांडगे
Wednesday, 7 October 2020

आरटीई मोफत प्रवेशप्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी फेरी शिक्षण विभागातर्फे सुरू करण्यात आली आहे.

औरंगाबाद : आरटीई मोफत प्रवेशप्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी फेरी शिक्षण विभागातर्फे सुरू करण्यात आली आहे. परंतु, यामध्ये प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची नावे नसल्याचे निदर्शनास येत आहे. शिक्षण विभागातर्फे प्रकाशित केलेल्या यादीत चक्क सोडतीत पात्र ठरलेल्या; परंतु प्रवेश न घेतलेल्या (नॉट ॲप्रोच) विद्यार्थ्यांची नावे असल्याचा धक्कादायक प्रकार पालक संघाने समोर आणला. शिक्षणाधिकारी कार्यालयाचा हा प्रताप शाळांच्या भल्यासाठी की कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आरटीईअंतर्गत मोफत प्रवेशप्रक्रिया प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना आठ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश दिला जाणार आहे. सोडतीमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत घेण्यात आली. यंदा प्रवेशप्रक्रियेत बदल करण्यात आले. त्यामध्ये एकच सोडत घेण्यात आली. त्यासह तेवढ्याच जागांसाठी सोबतच प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. सोडत झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाही, अशा रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.

Corona Update : औरंगाबादेत नवे १७५ कोरोनाबाधित रुग्ण, बरे झाले ३३२ जण

त्याची प्रक्रियाही सुरू झाली; परंतु प्रतीक्षा यादीत पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांचीच नावे आहेत त्याच पालकांना प्रवेशाचे मेसेज गेले आहेत. अनेक शाळांबाबत असे प्रकार घडल्याचा आरोप आरटीई पालक संघाने केला आहे. त्याबाबत आरटीई कक्ष प्रमुखांची मंगळवारी (ता.सहा) संघाच्या अध्यक्षांनी भेट घेत माहिती दिली.

त्यांनी सांगितले, की शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या यादीत नॉट ॲप्रोच असे दर्शविलेल्या विद्यार्थ्यांचीच नावे असल्याने पालकांना समजेनासे झाले की नेमकी फेरी कोणासाठी? शाळा अशा पालकांना यादी दाखवते आणि परत पाठवत आहे. दरम्यान, चार हजारपैकी तीन हजार जागांवर प्रवेश झाले असून एक जागांसाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येते.
 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not Approach Students Name In RTE Admission List Aurangabad News