esakal | नोकरीच्या आमिषाने गंडा घालणारा अटकेत, शाळेतून निलंबित होऊनही कारनामे होते सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

1crime_33

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या संशयिताला आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी (ता.२३) बेड्या ठोकल्या.

नोकरीच्या आमिषाने गंडा घालणारा अटकेत, शाळेतून निलंबित होऊनही कारनामे होते सुरू

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या संशयिताला आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी (ता.२३) बेड्या ठोकल्या. अशोक साहेबराव वैद्य (२९, रा. जमनज्योती, हर्सूल) असे संशयित आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे आरोपी हा नाशिक येथील शासकीय अंधशाळेत कनिष्ठ काळजी वाहक म्हणून कार्यरत असून तो सध्या निलंबित असल्याचे पोलिसांनी सांगितले.


प्रकरणात योगेश गोरे (वय ३३, चिकलठाणा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गोरे हे १८ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांच्या ओळखीचे दीपक शहाणे (रा. पिसादेवी रस्ता, हर्सूल) यांच्या जालना रस्त्यावरील टॅक्स कन्सल्टन्सीच्या कार्यालयात कामानिमित्त गेले होते. तेथे गोरे यांची शहाणेमार्फत आरोपी अशोक वैद्य याच्याशी ओळख झाली होती. तेव्हा आरोपीने, मी समाजकल्याण विभागात नोकरीला असून रेल्वे खात्यातील मोठे मोठे अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत. मी काही परिचयाच्या लोकांना रेल्वेत तिकीट कलेक्टरची नोकरी लावून दिली आहे. तुम्हालाही नोकरी लावून द्यायची असल्यास अकरा लाख रुपये लागतील अशी बतावणी केली. वैद्यने गोरे यांच्या ओळखीचे अक्षय गायके (रा.औरंगाबाद) यालाही नोकरी लावण्यासाठी गोरेप्रमाणेच पैशाची मागणी केली होती.

Corona Update : आणखी १४६ जण कोरोनाबाधित, औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४० हजार ७०७ रुग्ण बरे

प्रशिक्षणासाठी आणले बिहारला
आरोपीने गोरे यांना कामासाठी दिल्‍लीला जावे लागेल असे सांगितले व त्यासाठी त्याने गोरे यांच्याकडून ५० हजार रुपये आपल्या एसबीआयच्या खात्यावर ट्रान्स्फर करून घेतले. त्यानंतर गोरे आणि अक्षय गायके रेल्वेने तर आरोपी वैद्य विमानाने दिल्लीला गेला. तेथे आरोपीने गोरे व गायकेला रेल्वे मंत्रालयात नेत, रेल्वे मंत्र्याचा पीए असल्याचे बतावणी करून एका व्यक्‍तीची भेट घालून दिली. तसेच तुमचे काम स्पोर्ट कोट्यातून करतो अशी थाप मारली. त्यानंतर गोरे व गायके औरंगाबादला परतले. २६ फेब्रुवारी २०१९ रोजी आरोपीने गोरे व गायकेला टीसीच्या नोकरीचे जॉइंनिंगचे पत्र दिले व दिल्‍लीला हजर होण्यास सांगितले. त्यावेळी दोघांनी आरोपीला प्रत्येकी १० लाख रुपये दिले. सात मार्च २०१९ रोजी गोरे व गायके हे दिल्‍लीला गेले. त्यांच्या पाठोपाठ आरोपीने दिल्‍ली गाठली. त्यानंतर ट्रेनिंगसाठी आरोपीने दोघांना सासाराम (बिहार) येथे आणले. तेथे करण जाधव नावाचा मुलगा होता त्याला देखील आरोपीने नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत आणले होते. तेथे १०-१५ दिवस प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रकृती खालावल्याने गोरे व उर्वरित दोघे औरंगबादला परतले. आरोपीने अद्यापपर्यंत चार लाख रुपये परत दिले.

स्काउट गाइडच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक

आरोपी अशोक वैद्य याने जालना रस्त्यावरील कुशलनगर येथे यूथ असोसिएशन यूथ इंटरनॅशनल स्काउट अ‍ॅण्ड गाइडचे कार्यालय थाटले होते. त्या आधारे तो हे धंदे करायचा. आरोपीने गोरे यांच्याप्रमाणे अक्षय गायके, संतोष मैनाजी शहाणे, राहुल आदिनाथ गोरे, किरण जाधव, वीरेंद्र बागूलसह तीस जणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रूहिना अंजूम यांनी मंगळवारी (ता.२४) दिले. या प्रकरणात सहायक सरकारी वकील नितीन जाधव यांनी काम पहिले.

संपादन - गणेश पिटेकर