esakal | वैजापूर : जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला
sakal

बोलून बातमी शोधा

One Murdered at Tidi Vaijapur

तिडी येथील रघुनाथ डुकरे यांच्या मालकीचे शेत गट क्रमांक २४ मध्ये गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत ग्रामस्थांना आढळून आला.

वैजापूर : जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वैजापूर (जि. औरंगाबाद) - तिडी (ता. वैजापूर) गावालगत असलेल्या एका शेतात गुरुवारी (ता.२०) एका अनोळखी व्यक्तीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. 

तिडी येथील रघुनाथ डुकरे यांच्या मालकीचे शेत गट क्रमांक २४ मध्ये गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत ग्रामस्थांना आढळून आल्याने त्यांनी तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गोपाळ रांजणकर, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक रमेश जाधवर, संजय घुगे, रजाक शेख आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना मृतदेहाशेजारी अंध लोकांच्या वापराची काठी सापडल्याने मृत व्यक्ती अंध होती व तिचे वय अंदाजे २५ ते ३० वयोगटादरम्यान असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय पेट्रोलची अर्धवट रिकामी बाटली व एक लोखंडी गजाचा रॉडसुद्धा घटनास्थळी पोलिसांना मिळून आला. यावेळी श्वानपथकासह अंगुलीतज्ज्ञ पथकास या ठिकाणी पाचारण करण्यात आले. मात्र तपासकार्याला विशेष गती मिळाली नाही. वैजापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. 
 

विहिरीत पडून भिंगीत एकाचा मृत्यू 

भिंगी (ता. वैजापूर) येथे विहिरीत पडून एकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता.२०) सकाळी घडली. अशोक केशवराव घायवट (वय ६३, रा. भिंगी, ता. वैजापूर) असे मृताचे नाव आहे.  भिंगी शिवारातील शेत गट क्रमांक १०७ मधील विहिरीत पडून पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. मृताचे नातेवाईक गणेश अशोक घायवट यांनी अशोक घायवट यांना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 

go to top