चोरीचा माल विकायला आले अन् जाळ्यात अडकले, तीनपैकी दोन कुख्यात गुन्हेगार

मधुकर कांबळे
Wednesday, 21 October 2020

चोरी केलेला माल विकण्यासाठी निघालेल्या कुख्यात गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली.

औरंगाबाद : चोरी केलेला माल विकण्यासाठी निघालेल्या कुख्यात गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ६३ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी (ता.२०) दुपारी केली असून दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आसेगाव फाटा येथे तिघेजण चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी येणार आहेत या माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे व त्यांच्या पथकाने दुपारी सापळा रचला.

Corona Update : औरंगाबादेत नवे १५६ रुग्ण, उपचारानंतर २१९ जणांना सुटी

त्यावेळी दुचाकीवर (एमएच-२०, सीके-६५२०) बसून रवी जगताप काळे (वय २३ ), तुणतुण्या ऊर्फ राजू जगताप काळे (२५) दोघेही राहणार सिंधीसिरसगाव, ता. गंगापूर आणि कबीर रामा काळे (१९) राहणार आजोबानगर, वाळूज हे तिघेजण आले. त्यांची झडती घेतली असता त्यांना वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कलम ३८० च्या गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील एक मोबाईल हॅण्डसेटसह तीन मोबाईल हॅण्डसेट, एक मोटारसायकल आणि एक होमथिएटर असा ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

यातील रवी, तुणतुण्या यांच्यावर दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, सहायक फौजदार अजहर शेख, जमादार संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, गणपत गरड, भगवान शलोटे, विलास वाघ, विठ्ठल सुरू, विशाल पाटील, आनंद वाहूळ, श्री. लाड, देवचंद महेर, नितीन देशमुख यांनी ही कारवाई केली.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Arrested Three Criminals Aurangabad News