पोलिस चक्रावले; महिलेने चक्क रस्त्याविरोधात मानसिक, शारीरिक त्रास देत असल्याची केली तक्रार

नवनाथ इधाटे
Monday, 7 December 2020

आतापर्यंत आपण अनेक प्रकारच्या तक्रारी पाहिल्या असून चक्क रस्त्यावर गुन्हा दाखल करावा तो मला छळतोय, अशी पहिलीच तक्रार फुलंब्री पोलिस ठाण्यात एका महिलेने दिली आहे.

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : आतापर्यंत आपण अनेक प्रकारच्या तक्रारी पाहिल्या असून चक्क रस्त्यावर गुन्हा दाखल करावा तो मला छळतोय, अशी पहिलीच तक्रार फुलंब्री पोलिस ठाण्यात एका महिलेने दिली आहे. औरंगाबाद शहरातून नियमित फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या संध्या घोळप- मुंडे या महिलेने फुलंब्री पोलिस ठाणे गाठून औरंगाबाद-फुलंब्री हा रस्ता मला छळतोय. त्याच्यामुळे मला शारीरिक व मानसिक आणि आर्थिक त्रास होत आहे, अशा प्रकारची तक्रार या महिलेने दिली आहे. हे ऐकून पोलिसही चक्रावले.

फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून संध्या घोळप - मुंडे या मागील गेल्या १४ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यामुळे संध्या मुंडे दररोज औरंगाबाद ते फुलंब्री ये-जा करीत असतात. त्यामुळे या रस्त्याच्या प्रवासाला त्या कंटाळा आल्या आहेत. औरंगाबाद ते फुलंब्री हा सुमारे तीस किलोमीटरचा रस्ता मागील गेल्या तीन वर्षापासून रस्त्याचे काम सुरू असल्याने जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे असंख्य त्रासांना सामोरे जावे लागत असल्याने त्याचबरोबर सदरील कामाचा कंत्राटदार पहिला काम सोडून गेला.

रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने तब्बल एक वर्ष नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू होते. संध्या घोळप- मुंडे या गेल्या १४ वर्षांपासून या रस्त्याच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळलेल्या आहेत. त्यामुळे संध्या मुंडे यांनी वैतागून फुलंब्री पोलिस ठाणे गाठून फुलंब्री-औरंगाबाद या रस्त्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. हा रस्ता मला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास व्हावा या हेतूने धक्काबुक्की आणि अडवणूक करीत आहे. हा रस्ता सुधारेल अशी मला आशा होती, मात्र तसे न होता हा रस्ता दिवसेंदिवस प्राणघातक बनत चालला आहे असं त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.
 

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Shocked, Woman Filed Complaint Against Road Aurangabad News