औरंगाबाद मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी हर्षवर्धन जाधव, दाशरथे

अतुल पाटील
Saturday, 29 February 2020

औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून जिल्ह्यात नऊपैकी सहा आमदार आहेत. हर्षवर्धन जाधव आणि सुहास दाशरथे हे दोन्ही नेते शिवसेनेतून मनसेत दाखल झाल्याने ते शिवसेनेशी दोन हात करण्याच्या तयारीत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकरांना हटवले असले तरी, त्यांचे पुनर्वसन लवकरच होणार असल्याची माहिती वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली.

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठे फेरबदल केले आहेत. जिल्हाध्यक्षपदी सुहास दाशरथे आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची नियुक्ती केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी प्रमुख पदाधिकाऱ्यांची शनिवारी (ता. २९) बैठक बोलावण्यात आली होती, त्यानंतर नियुक्तीपत्र देण्यात आले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंधरा दिवसांपूर्वीच तीन दिवसांचा औरंगाबाद दौरा केला होता. या दौऱ्यात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक, कार्यकर्त्यांचा मेळावा घेत मार्गदर्शन केले. याचवेळी शहरातील इतर नामांकित लोकांशीही चर्चा केली. याचवेळी त्यांनी येत्या काही दिवसात संघटनात्मक फेरबांधणी करणार असल्याचे सांगितले होते. तसेच माध्यमांना चुकीच्या बातम्या देणाऱ्या आणि पक्षविरोधी काम करणारे मला पक्षांमध्ये नको आहेत, असे ठणकावत त्यांना मुक्त करणार असल्याचे सांगितले होते.

हेही वाचा - बाहेरच्या उमेदवाराला लाथ घाला, औरंगाबादेत कोण म्हणतय

पक्षशिस्त भंग केल्याचा ठपका ठेवत मनसेने पहिली कारवाई जिल्हाध्यक्ष गौतम आमराव यांच्यावर केली. याबाबतचे पत्र २१ फेब्रुवारीला काढण्यात आले आहे. त्यानंतर आज (ता २९) औरंगाबाद शहरातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत कृष्णकुंज येथे बैठक बोलावली होती. यात सुहास दाशरथे, हर्षवर्धन जाधव, सुमित खांबेकर, सतनामसिंग गुलाटी, बिपीन नाईक यांना बोलावले होते. याचवेळी नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा करण्यात आली. निवडीचे पत्र राज ठाकरे यांनी दिले.

हेही वाचा - आपण औरंगजेबाचे वंशज नाही, शहराचे नाव संभाजीनगर व्हायला हवं

औरंगाबाद शहरातील तीन तसेच गंगापूर आणि वैजापूर अशा पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दाशरथे यांच्याकडे देण्यात आली आहे तर, कन्नड, सिल्लोड या दोन मतदारसंघाची जबाबदारी हर्षवर्धन जाधव यांच्यावर सोपवली आहे. जिल्ह्यातील पैठण आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.

सुमित खांबेकरांचे पुनर्वसन?
मनसेचे दोनच दिवसापुर्वी आकाशवाणी चौकात भव्य कार्यालय सुरू केले आहे. कलश पूजन झाल्यानंतर मनसेतर्फे शहरात विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून जिल्ह्यात नऊपैकी सहा आमदार आहेत. हर्षवर्धन जाधव आणि सुहास दाशरथे हे दोन्ही नेते शिवसेनेतून मनसेत दाखल झाल्याने ते शिवसेनेशी दोन हात करण्याच्या तयारीत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकरांना हटवले असले तरी, त्यांचे पुनर्वसन लवकरच होणार असल्याची माहिती वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suhas Dasharetha, Harshvardhan Jadhav as MNS district president