esakal | कर भरून मनस्ताप, ऑनलाइन त्रुटीमुळे मिळेना पोचपावती
sakal

बोलून बातमी शोधा

2Aurangabad_Municipal_Corporation_0

ऑनलाइन कामकाजाला सर्वत्र प्राधान्य दिले जात आहे. महापालिका प्रशासनानेही ऑनलाइन मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

कर भरून मनस्ताप, ऑनलाइन त्रुटीमुळे मिळेना पोचपावती

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : ऑनलाइन कामकाजाला सर्वत्र प्राधान्य दिले जात आहे. महापालिका प्रशासनानेही ऑनलाइन मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोरोनाकाळात अनेकांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकांनी ऑनलाइन मालमत्ता कर भरला, खात्यातून रक्कम कपातही झाली खरी मात्र अनेकांना कर भरल्याची पावतीच मिळाली नाही. यामुळे उगीच ऑनलाइन कर भरला असा मनस्ताप त्यांच्या वाट्याला आला आहे.

महिला, बालकांवरील गुन्ह्यात वाढ! महिलांवरील ३० टक्के गुन्हे पती, नातेवाईकांशी संबंधित

ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाने अनेक नावीन्यपूर्ण योजना तयार केलेल्या आहेत. ऑनलाइन कर भरला आणि तो वेळेच्या आधी असल्यास दोन ते चार टक्क्यांपर्यंत सवलत मिळते. त्यामुळे नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांनी ऑनलाइन मालमत्ता कर भरला. गेल्या काही वर्षांमध्ये नागरिकांना कर भरताना किंचितही अडचणी आल्या नाहीत. कोरोना मार्च महिन्यापासून सुरू झाला. एप्रिल महिन्यात नवीन आर्थिक वर्षाचे कर भरण्यात येते. त्यामुळे शहरातील किमान ६०० पेक्षा अधिक मालमत्ताधारकांनी ऑनलाइन कर भरला.

सॉफ्टवेअर मधील त्रुटींमुळे काही नागरिकांच्या खात्यातून दोन वेळेस ही रक्कम कपात झाली. काही नागरिकांना कर भरल्याची पावतीच मिळाली नाही. त्यामुळे आपली कपात झालेली रक्कम कररूपानेच गेली किंवा नाही हे समजायला मार्ग राहिला नाही. याशिवाय विविध मोबाइल कंपन्यांनी ऑनलाइन कर भरला आहे त्यांनाही पावती मिळालेली नाही. त्यामुळे नागरिक महापालिकेच्या संगणक विभागात तर मोबाइल कंपन्यांचे प्रतिनिधी लेखा विभागात हेलपाटे मारत आहेत तर कोरोनामुळे काही कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे चौकशीसाठी जाणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी कोणीच तयार नाही. प्रशासनाने हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

संपादन - गणेश पिटेकर