शिक्षक कोरोना पाॅझिटिव्ह, औरंगाबादमधील 'त्या' शाळेला सुटी

संदीप लांडगे
Monday, 15 February 2021

शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थितीची संख्या ५५ ते ६० टक्क्यांपर्यंतच असून पालक त्यांच्या पाल्यांना पाठवण्याबाबत अजूनही द्विधा मनस्थितीत असल्याचेच चित्र आहे.

औरंगाबाद : शाळा सुरू झालेल्या असल्या तरी कोरोना थांबलेला नाही. औरंगाबादेतील एका शिक्षकाची कोरोना चाचणी सकारात्मक आल्यानंतर संबंधित शाळेला आठ दिवस सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पडेगाव येथील एका राजकीय पुढाऱ्याची संस्था असलेल्या या शाळेतील शिक्षक पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

या संदर्भात माध्यमिकचे शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण यांनी पाॅझिटिव्ह आढळलेल्या शिक्षकाच्या संपर्कातील शाळेतील इतरांनीही चाचणी करून घ्यावी व संस्थेला सुटी द्यावी, असे कळवले आहे. दरम्यान, शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थितीची संख्या ५५ ते ६० टक्क्यांपर्यंतच असून पालक त्यांच्या पाल्यांना पाठवण्याबाबत अजूनही द्विधा मनस्थितीत असल्याचेच चित्र आहे. केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ६० टक्क्यांच्या आसपास असून ऑफलाईन व ऑनलाईन हे दोन्ही पर्याय समोर असल्याने अनेक पालक विद्यार्थी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन तासिकेलाच पसंती देत असल्याचेही समोर आले आहे.

विदर्भात नागपूरजवळील एका गावांत ७० पेक्षा अधिक विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. औरंगाबादेतही शिक्षकच कोरोनाबाधित आल्यामुळे शाळेला सुटी द्यावी लागत असून पालकवर्ग विद्यार्थ्यांना नव्याने सुरू झालेल्या शैक्षणिक सत्रासाठी पाल्यांना पाठवण्यासाबत संभ्रमात असल्याचे दिसत आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher Tested Covid Positive, School Close For Eight Days Aurangabad News