औरंगाबाद जिल्ह्यातील येसगाव परिसरात बेमोसमी पाऊस, शेतकऱ्यांची धांदल उडाली

दीपक जोशी
Sunday, 13 December 2020

गंगापूर तालुक्यातील येसगाव, दिघी व परिसरात रविवारी (ता.१३) दुपारी चारच्या सुमारास अचानक बेमोसमी पावसाला सुरुवात झाली.

लिंबेजळगाव (जि.औरंगाबाद) : गंगापूर तालुक्यातील येसगाव, दिघी व परिसरात रविवारी (ता.१३) दुपारी चारच्या सुमारास अचानक बेमोसमी पावसाला सुरुवात झाली. दिवसभर ढगाळ वातावरण व गारवा निर्माण झाला होता. अचानक पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. कापूस वेचणी सुरु असल्याने नागरिक कापूस वेचणी करीत होते. मात्र पावसाची रिपरिप सुरु झाल्याने शेतकऱ्यांना घरचा रस्ता धरावा लागला.

या बेमोसमी पावसाने गव्हाचे पीक सध्या चांगल्या स्थितीत असले तर त्यावर कोकडा, मावा पडून पिकाचे उत्पादन घटेल व हरभरा पिकाची नुकतीच पेरणी केली असली तरी या पावसाने त्या पिकाचेही अतोनात नुकसान होणार असल्याचे शेतकरी सतीश खोचे यांनी सांगितले. रब्बी हंगामात पावसाने खराबी केल्याने खरीप हंगामात चांगल्या प्रकारचे उत्पादन येईल अशी आशा असतांना आजच्या पावसाने व पुढील ही काही दिवस पावसाचे वातावरण असल्यास त्यातही पिकाचे उत्पादन घटणार असल्याचे डिगंबर बनकर यांनी सांगितले. परिसरात सर्वत्र गारठा निर्माण झाला असल्याने नागरिकांनी दिवसभर स्वेटर कानाला रुमाल बांधून प्रवास करीत असल्याचे दिसुन आले. या वातावरणात बदल झाल्याने नागरिकांची दवाखान्यात गर्दीही होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Untimely Rain In Yesgaon Aurangabad News