मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी, जायकवाडी धरण ९८ टक्के भरले

चंद्रकांत तारु/गजानन आवारे
Monday, 7 September 2020

पैठण (जि.औरंगाबाद)  येथील जायकवाडी धरणातील पाणी पातळीत वाढ होत असल्याने उघडण्यात आलेल्या चार दरवाजानंतर रविवारी (ता.सहा) पुन्हा सहा दरवाजे अर्धाफूट उंचीने उघडण्यात आले आहे.

पैठण (जि.औरंगाबाद) : येथील जायकवाडी धरणातील पाणी पातळीत वाढ होत असल्याने उघडण्यात आलेल्या चार दरवाजानंतर रविवारी (ता.सहा) पुन्हा सहा दरवाजे अर्धाफूट उंचीने उघडण्यात आले आहे. त्यामुळे आता धरणाच्या एकुण २७ वक्र दरवाजांपैकी एकुण १२ दरवाजातून पाणी विसर्ग सुरु झाला आहे. या आठ दरवाजांतून सात हजार ८७७ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदापात्रात सुरु करण्यात आला आहे.

धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्यांवर पोचला आहे. धरणाच्या दरवाजा क्रमांक १६, २१, १४, २३, १२, २५, ११, २६ हे दरवाजे उघडण्यात आले आहे. यापूर्वी धरण प्रशासनाने पाणी सोडण्यात आलेल्या पहिल्या दिवशी शनिवारी (ता.पाच) दुपारी बारा वाजेच्या दरम्यान दोन दरवाजे उघडण्यात आले. यानंतर सायंकाळी सहा वाजता पाण्याची आवक लक्षात घेऊन धरण प्रशासनाकडून दोन दरवाजे उघडुन पाणी सोडण्यात आले होते.

खुशखबर ! वीज पुरवठा खंडीत झाला तरीही तुमच्या घरातली लाईट नाही जाणार ! 

त्यामुळे एकुण चार दरवाजांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. आज पुन्हा धरण प्रशासनाने पाणी पातळी व वरील भागातील पावसाची शक्यता गृहीत धरुन चार दरवाजे उघडुन पाणी पातळीवर नियंत्रण ठेवले आहे. दरम्यान, गोदावरी होणारा पाण्याचा विसर्ग व वाढती पाणी पातळीवर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता दिलीप तवार, जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे, शाखा अभियंता अनिकेत हसबनीस हे विशेष लक्ष ठेवून आहेत.

जलविद्युत केंद्रातून ही पाण्याचा निश्चित केलेला विसर्ग सुरु असल्याचे धरण प्रशासनाने सांगितले. धरण सहायक अभियंता संदीप राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार धरणाची पाणी पातळी १५२१.७५ फुटांमध्ये असून ४६३.८२९ मीटरमध्ये आहे. पाण्याची आवक १३२६२ क्यूसेक आहे. एकूण पाणीसाठा : २८७९.१८९दलघमी घनमीटर, तर जिवंत पाणी २१४१.०८३दलघमी असुन धरणाची टक्केवारी ९८.६२ आहे. या व्यतिरिक्त उजवा कालवा विसर्ग ६०० क्युसेक व पैठण जलविद्युत केंद्र १५८९ क्युसेक आहे. तसेच डावा कालवा  ५०० क्युसेक  आहे.

खडसेंनी शिवसेनेत यावे, सेनेच्या 'या' मंत्र्यांनी दिली ऑफर !

गोदाकाठच्या नागरिकांनी सावधान राहावे
जायकवाडी धरणातुन नव्याने दरवाजे उघडण्यात आले आहे. या दरवाजांची संख्या आता आठ झाली आहे. त्यामुळे पुन्हा पावसाचा जोर वाढल्यास आणखी दरवाजे उघडण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या करिता गोदाकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.

(संपादन - गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Releases From Jayakwadi Dam Aurangabad News