किडणी फेल्युर टाळता येते, पण कसे?

photo
photo

औरंगाबाद : किडनीचा आजार झाल्यास डायलिसीस आणि किडनी प्रत्यारोपण सर्वसामान्यांना परवडणारे नाही. म्हणूनच काळजी आणि वेळीच उपचार हाच किडनी वाचविण्याचा खरा मार्ग आहे. किडनीचा आजार होऊ नये, यासाठी नियमितपणे काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत किडनी विकारतज्ञ डॉ. शेखर शिराढोणकर यांनी व्यक्त केले. 
“जागतिक किडनी दिन” दरवर्षी मार्चच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा करण्यात येतो. यंदा १२ मार्च हा किडनी दिन साजरा केला जात आहे. सर्वांनाच किडनी अवयवाविषयीची व आजारांची माहिती मिळावी या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. या वर्षी जागतिक किडनीदिनाचे ब्रीद ‘सर्वांसाठी व सर्वत्र किडनीचे आरोग्य-तपासणी व आजार टाळण्याचे उपाय’ हे आहे. 

हे केलेच पाहिजे 

- दररोज तीन लिटरहून अधिक पाणी पिणे (शरीरावर सूज नसल्यास). 
- नियमित व्यायाम करणे व वजन नियंत्रणात ठेवणे. 
- धूम्रपान, तंबाखू व दारूचे सेवन टाळणे. 
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशमन औषधांचे सेवन टाळणे. 
- मिठाचे अनावश्यक सेवन टाळणे. 
- वयाच्या चाळिशीनंतर वर्षातून एकदा वैद्यकीय तपासणी करून घेणे 

अशी आहेत प्राथमिक लक्षणे 

- चेहरा व पायावर सूज येणे, 
- उलटी मळमळ होणे, अन्नाची चव नसणे 
- वजन कमी होणे, थकवा जाणवणे 
- लघवीला त्रास होणे 
- रात्री वारंवार लघवीला जाणे, लघवीवाटे प्रथिने जाणे किंवा 
- रक्तातील युरिया/ क्रिआटिनिनचे प्रमाण वाढणे 

अशी घ्यावी काळजी 
 
- मधुमेहाच्या रुग्णांनी औषधे व पथ्य पाळून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे. 
रक्तदाब नियंत्रणात ठेवणे. दर तीन महिन्यांनी लघवीतील प्रथिनांचे प्रमाण तपासून घेणे. रक्तातील साखरेचे प्रमाण वारंवार कमी होत असेल तर किडनीच्या आजाराची शक्यता पडताळून पाहणे. 
- उच्च रक्तदाब असणाऱ्यानी वेळेवर औषधी घेणे, जेवणात मिठाचे प्रमाण कमी ठेवणे, वर्षातून एकदा लघवी व रक्त तपासणे. कमी वयात उच्च रक्तदाबाचे निदान झाल्यास किडनीची तपासणी करणे. 
- क्रोनिक किडनी फेल्युअरच्या रुग्णांनी खाण्यातील पथ्ये पाळणे, नियमित औषधी घेणे, तपासणी करणे. (यामुळे डायलिसीस व किडनी प्रत्यारोपणाची गरज लांबणीवर टाकता येते.) 

किडनी फेल्युअर टाळता येते 

- मुलांच्या मूत्रमार्गातील संसर्ग : वारंवार ताप येणे, वजन न वाढणे, लघवीमध्ये जंतुसंसर्ग होणे, या लक्षणांची वेळेवर तपासणी करून योग्य उपचार केल्यास भविष्यातील किडनी फेल्युअर टाळता येते. 
- मुतखडा व प्रोस्टेट ग्रंथीची सूज : योग्य तपासणी, औषधोपचार करून घेणे. गरजेनुसार शस्त्रक्रियेद्वारे उपचार करणे, मुतखडा वारंवार होऊ नये म्हणून भरपूर प्रमाणात पाणी पिणे, खाण्यातील पथ्य पाळणे. 
- अचानक किडनी फेल झाल्यास : अतिप्रमाणात जुलाब, मलेरिया, रक्तातील जंतुसंसर्ग, अतिरक्तस्राव, मूत्रमार्गातील अडथळे हे अचानक किडनी फेल होण्याची मुख्य कारणे आहेत. वेळीच योग्य उपचार केल्यास किडनी फेल होणे टाळता येते. 
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचा वापर : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वारंवार वेदनाशमन औषधी घेणे हे किडनी फेल होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. काही आयुर्वेदिक औषधांमधील जड धातू किडनीवर कायमस्वरूपाचे परिणाम करू शकतात, अशी औषधे टाळणे आवश्यक असते. 


किडनीचे मुख्य कार्य हे शरीरातील उपयुक्त नसलेले विषारी पदार्थ लघवीवाटे बाहेर फेकणे आहे. या व्यतिरिक्त आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य ठेवणे, व्हिटामिन डी कार्यरत करून हाडे मजबूत ठेवणे आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे कार्य करते. किडनीचे अनेक आजार खूप गंभीर स्वरूपाचे असतात. वेळीच उपचार न केल्यास गंभीर परिणाम होऊन किडनी फेल होण्याचा धोका असतो. क्रोनिक किडनी फेल्युअरसारख्या बऱ्या न होणाऱ्या आजाराच्या अंतिम टप्यातले, डायलिसीस आणि किडनी प्रत्यारोपणासारखे उपचार प्रचंड महाग असतात. त्यामुळेच प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर (Prevention is better than cure) या म्हणीचे पालन करणे गरजेचे आहे. 
-डॉ. शेखर शिराढोणकर, एम. डी., डी. एन. बी. (नेफ्रोलॉजी) 
किडनी विकारतज्ज्ञ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com