फौजदार होण्याचे सलमानचे स्वप्न हे स्वप्नच राहिले, प्रशिक्षणासाठी जाताना झाला अपघातात मृत्यू

कमलाकर रासने
Thursday, 26 November 2020

फौजदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पोलिस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी औरंगाबदला निघालेल्या २१ वर्षीय तरुणाचा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी २० फूट खोल पुलाखाली पाण्यात पडली. या अपघातात तरुण जागेवरच ठार झाला.

महालगाव (जि.औरंगाबाद) : फौजदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पोलिस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी औरंगाबदला निघालेल्या २१ वर्षीय तरुणाचा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी २० फूट खोल पुलाखाली पाण्यात पडली. या अपघातात तरुण जागेवरच ठार झाला. ही घटना बुधवारी (ता.२५) सकाळी ८ वाजेच्या सुमारास वैजापुरातील चिंचडगाव वळणावर घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सलमान युनूस शेख (वय २१, रा. एनएमसी कॉलनी, वैजापूर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सलमान सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. त्याला फौजदार होण्याचे स्वप्न होते. बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास तो पोलिस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी औरंगाबादला जाण्यासाठी दुचाकीवरून निघाला होता. चिंचडगाव वळणावर येताच समोर अचानक सुमारे ८ ते १० फुटाचा मातीचा ढिगारा दिसल्याने सलमानचा दुचाकीवरील नियंत्रण सुटले व त्या मातीच्या ढिगावर धडकून तो २० फूट खोल पुलाखाली पाण्यात पडला.

या भीषण अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. घटनेची माहिती मिळताच विरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने सलमानला पाण्याबाहेर काढत ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. सलमानला फौजदार होऊन मोठ नाव कमवायचे होते. पण या अपघाताने त्याचे स्वप्न भांगले. सलमानच्या आकस्मिक मृत्यूने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young Man Died In Accident Vaijapur Aurangabad News