एक-दोन नव्हे तर अख्खे पोलिस पथकच लाचेच्या सापळ्यात

सुषेन जाधव
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

सहायक निरीक्षकासह तीन जमादार अटकेत 

औरंगाबाद : एरव्ही एक दोन पोलिस लाचेच्या सापळ्यात अडकतात; परंतु चक्क तपासासाठी आलेले पोलिस पथकच लाचेच्या सापळ्यात अडकले तर? होय हे औरंगाबादमध्ये घडले आहे. सहायक निरीक्षकांसह चौघांचा समावेश या पथकात असून, घरफोडीतील संशयिताला घेऊन नाशिक येथून तपासासाठी आल्यानंतर लाच प्रकरणामुळे या पोलिस पथकालाच औरंगाबादेत बेड्या ठोकल्या गेल्या. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने शुक्रवारी (ता. सात) चौधरी कॉलनीत केली.

 लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, सहायक पोलिस निरीक्षक योगेश चंद्रकांत पाटील (वय 43), पोलिस नाईक अनिल दामाजी केदारे (वय 48), मिथून किसनराव गायकवाड (वय 38) व पोलिस शिपाई प्रदीप कचरू जोंधळे (वय 27) अशी अटकेतील संशयित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तेआडगाव पोलिस ठाणे (नाशिक पोलिस आयुक्‍तालय) येथे कार्यरत आहेत. 
या प्रकरणात एका महिलेने तक्रार दिली. त्यानुसार, नाशिक येथील आडगाव पोलिस ठाण्यात तक्रारदार महिलेच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. 
तक्रारदार यांच्या भाऊ कैलास काकडे याला नाशिकमध्ये घरफोडीच्या गुन्ह्यात अटक झाली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक योगेश पाटीलकडे होता. कैलास काकडे याला घेऊन सहायक निरीक्षक पाटील, केदारे, जोंधळे व गायकवाड या पोलिस पथकाकडे देण्यात आली होती. 
या गुन्ह्यात मदत करण्यासाठी संशयित पोलिस पथकाने महिलेकडे दहा हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती चार हजार रुपये देण्याचे ठरले होते.

ही रक्कम भावाकडे द्यावी असेही संशयित पथकातील पोलिसांनी तक्रारदार महिलेला सांगितली; मात्र त्यांनी याविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर सापळा रचून संशयित पोलिसांनी ऐकमेकांच्या संमतीने घेतलेल्या लाचेसह लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतले.

संशयितांच्या घराची झडती 
विशेष म्हणजे संशयित चारही पोलिसांच्या घराची झडती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. रात्री अपरात्री कोणताही पंच सोबत नसतांना घरझडती घेण्यामागचा उद्देश काय होता, तसेच आजवर अशा कित्येक प्रकरणात लाच घेतली आहे, हे मात्र गुलदस्त्यात आहे. असे असले तरी उघडकीस आलेल्या या गुन्ह्यानंतर काही प्रकरणे समोर येण्याची शक्‍यता असल्याचा दुजोरा एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bribe taken by the police squad