मोक्का प्रकरणात 14 जणांना अटक,

सुषेन जाधव
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

  • बीड येथील प्रकरण
  • खंडणीसाठी केला होता एकाचा खून 
  • चार आरोपी अजूनही फरार 
  • पाळत ठेऊन केला हल्ला 
     

औरंगाबाद : खंडणी दिली नाही म्हणून तलवार, खंजीर, कुकरीने हल्ला करून एकाचा खून केल्याच्या मोक्का प्रकरणात 14 संशयितांना न्यायालयीन कोठडीतून ताब्यात घेत त्यांना अटक करण्यात आली. ही घटना 19 सप्टेंबरला बीडमधील सना फंक्‍शन हॉलच्या जवळ घडली होती. 

याप्रकरणी मृत सय्यद साजेदअली मीर अन्सारीअली (38, रा. काझीनगर, बालेपीर, नगर रस्ता, बीड) यांचा भाऊ सय्यद जावेदअली अन्सारअली (48, रा. काझीनगर, बीड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, टोळीप्रमुख अन्वरखान ऊर्फ गुज्जरखान मिर्झाखान (28, रा. बीड) व त्याच्या साथीदारांनी सय्यद साजेदअली यांना खंडणी मागितली होती; मात्र सय्यद यांनी खंडणी न दिल्यामुळे संशयितांनी त्यांच्या दोन्ही पायांवर गंभीर हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

त्यावेळी साजेदअली यांनी दिलेल्या तक्रारीवरून अन्वरखान व त्याच्या साथीदारांवर बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 19 सप्टेंबरला 18 पेक्षा जास्त आरोपींनी साजेदअली यांच्यावर तलवार, खंजीर, कुकरीने सपासप वार करून खून केला. 

हे आहेत ​आरोपी 
प्रकरणात खुनाच्या गुन्ह्यासह इतरही गुन्हे दाखल होऊन टोळीप्रमुख अन्वरखान याच्यासह सर्फराज आयाजुद्दीन काझी (32), फैजमोहम्मद खान ऊर्फ पापाभाई नजीर मोहम्मद खान (63), सय्यद नूर ऊर्फ मिनाज ऊर्फ मीना सय्यद मुबारक (55), मुजीबखान मिर्झाखान पठाण (50), सय्यद नासेर सय्यद नूर (30), सय्यद शाहरुख सय्यद नूर (23), शेख उबेद शेख बाबू (28), शेख शाहबाज शेख कलीम (31), शेख अमर शेख अकबर (30), आवेज काझी मुखीद काझी (26), शेख इम्रान ऊर्फ काला शेख रशीद (30), बबरखान गुलमोहंमद खान पठाण (28), शेख वसीम शेख बुऱ्हानोद्दीन (30, सर्व रा. बीड) यांना अटक करून त्यांची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. दरम्यान, चौघे अजूनही फरारी आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14 accused in mcoca crime