
कोरोनाची पुन्हा दस्तक
हिंगोली - जिल्ह्यात हळूहळू कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. सध्या १५ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे चौथ्या दस्तक मिळाली असून, ही लाट टाळायची असेल तर ज्यांनी लसीचा पहिला, दुसरा डोस घेतला नाही त्यांनी तो घ्यावा. शिवाय जे बूस्टर डोससाठी पात्र आहेत त्यांनी बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभाग करीत आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या वतीने ‘हर घर दस्तक’ योजनेअंतर्गत पथके तयार करून घरोघरी जाऊन लसीकरण केले जात आहे.
महिन्याभरापासून कोरोना रुग्ण संख्येत राज्यात व जिल्ह्यात वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने लसीकरणास गती दिली आहे. ‘हर घर दस्तक’ योजनेअंतर्गत लसीकरणास वेग आला आहे. या योजनेसाठी २४ प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरोग्य विभागाची पथके रोज लाभार्थींच्या घरी जाऊन लसीकरण करून घेतले किंवा नाही याची चौकशी करून लस न घेतलेल्या लोकांना लस देत आहेत. त्यामुळे सध्या लसीकरणाचा वेग वाढला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.
अशी घ्या काळजी
नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, मास्कचा वापर करावा, वारंवार साबणाने हात धुवावेत, तसेच ज्यांना सर्दी, ताप अशी लक्षणे आहेत त्यांनी तत्काळ कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
बूस्टर डोस म्हणजे काय?
सामान्य लसी व्यतिरिक्त, बूस्टर डोस विशिष्ट जंतू किंवा विषाणूविरुद्ध लढण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते आणि मजबूत करते. हा बूस्टर डोस व्यक्तीने आधी घेतलेल्या लसीचा असू शकतो. शरीरात अधिक अॅन्टीबॉडीज तयार करून रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. सोप्या भाषेत सांगायचे तर, बूस्टर डोस शरीराच्या प्रतिकारशक्तीची आठवण करून देतो की एखाद्या विशिष्ट विषाणूविरुद्ध लढण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे.
बूस्टर डोस कोणाला मिळेल?
१८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीला बूस्टर डोस मिळू शकतो. ज्यांच्या दुसऱ्या डोसनंतर ९ महिने (३९ आठवडे) पूर्ण झाले आहेत. बूस्टर डोसमध्ये मिक्स ॲण्ड मॅच होणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. ज्या लोकांनी लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे त्यांना त्याच लसीचा बूस्टर डोस दिला जाईल. पण, ६० वर्षांपुढील नागरिक आणि फ्रंट लाइन वर्कर यांना शासकीय रुग्णालयात बूस्टर डोस मोफत आहे तर इतरांना खासगी रुग्णालयात काही रक्कम देऊन तो घेता येणार आहे.
आकडे बोलतात
(१८ वर्षांपुढील नागरिक)
पहिला डोस घेणारे (७७.८६ टक्के)
८ लाख ४७ हजार ४०७
दुसरा डोस घेणारे (६६.८८ टक्के)
७ लाख २७ हजार ९४७
बूस्टर डोस घेणारे
१२ हजार २५८
(फक्त ६० वर्षांपुढील आणि कोरोना योद्धे)
Web Title: 15 Active Corona Patients In Hingoli District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..