सहा मतदारसंघांसाठी 18 हजारांची फौज 

जालिंदर धांडे
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

एक हजार 214 परवाना शस्त्र होणार जमा, चार हजार 583 दिव्यांग मतदार; तृतीयपंथी पाच मतदार 

बीड - जिल्ह्यात एकूण सहा मतदारसंघ असून 20 लाख 55 हजार 168 मतदार हे सहा आमदारांची निवड करणार आहेत. सध्या राज्यात विधानसभांच्या तारखा जाहीर झाल्या असून, त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यात एक हजार 490 ठिकाणी दोन हजार 321 मतदान केंद्र असणार आहेत. याठिकाणी 17 हजार 918 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात शांतता कायम राखण्यासाठी पोलिस प्रशासनही सतर्क झाले आहे.

जिल्ह्यात एकूण एक हजार 214 शस्त्र परवानेधारक असून निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वांना संबंधित पोलिस ठाण्यात शस्त्रे जमा करावी लागणार आहेत. 
जिल्ह्यात एकूण 20 लाख 55 हजार 168 मतदार असून त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या दहा लाख 85 हजार 978, तर महिला मतदारांची संख्या नऊ लाख 69 हजार 185 आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांची संख्या जास्त प्रमाणात वाढली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली आहे. आता पर्यंत 98 टक्के मतदारांना ईपीक कार्डाचे वाटप केल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच, निवडणुकीच्या दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस दलाच्या वतीने गस्त वाढविण्यात आलेली आहे. यासह अवैध दारूसाठा, शस्त्र जप्त करणे, कोम्बिंग ऑपरेशन यासह गुन्हेगारी वृत्तींवर कडक कारवाया करणे, यासह इतर कारवाया पोलिस विभागातर्फे सुरू करण्यात आल्या आहेत. निवडणुका जवळ आल्यामुळे जिल्हा प्रशासनासह उमेदवार विधानसभेची तयारी करताना दिसत आहेत. 

एवढ्या असणार ईव्हीएम 
जिल्ह्यातील विविध भागांत दोन हजार 321 मतदान केंद्र असणार आहेत. याठिकाणी एकूण चार हजार 288 बॅलेट युनिट, तीन हजार, 69 कंट्रोल युनिट, तीन हजार 219 व्हीव्हीपॅट मशीन असणार आहेत. यासह या ठिकाणी दोन हजार 553 केंद्र अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 

असे असणार मनुष्यबळ 
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांसाठी क्‍लास वन दर्जाचे 354 अधिकारी, क्‍लास टू दर्जाचे 679 अधिकारी व क्‍लास थ्री दर्जाचे पंधरा हजार 724 कर्मचारी यासह इतर एक हजार 61 कर्मचारी असे मिळून 17 हजार, 978 अधिकारी व कर्मचारी यांचा फौजफाटा तैनान करण्यात आलेला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 18 thousand personnel are deployed for six constituencies