esakal | Killari Earthquake| महाविध्वंसक भूकंपानंतरची 28 वर्षे, मूलभूत गरजांचे पुनर्वसन कधी?
sakal

बोलून बातमी शोधा

महाविध्वंसक भूकंपाला 28 वर्षे, मूलभूत गरजांचे पुनर्वसन कधी?

महाविध्वंसक भूकंपाला 28 वर्षे, मूलभूत गरजांचे पुनर्वसन कधी?

sakal_logo
By
विश्वनाथ गुंजोटे

Killari Earthquake : ३० सप्टेंबर १९९३ साली पहाटे ३.५६ वाजता लातूर जिल्ह्यात किल्लारी इथं भूकंप झाला आणि होत्याचं नव्हतं झालं....

1993 Latur earthquake : किल्लारी (जि. लातूर) : लातूर - उस्मानाबाद जिल्ह्यांत ३० सप्टेंबर १९९३ ला झालेल्या महाप्रलंयकारी भूकंपाला गुरुवारी (ता. ३०) २८ वर्षे पूर्ण होत आहेत. पहाटे झालेल्या ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपाने दोन्ही जिल्ह्यांतील बावन्न गावांना हादरा दिला. भूकंपाने अनेकांचे प्राण हिरावले. घरे-दारे नष्ट झाली. क्षणार्धात सर्वकाही होत्याचे नव्हते झाले. शासनाने घरांचे पुनर्वसन केले. मात्र मूलभूत गरजा पुरविण्यात शासन अपयशी ठरल्याची खंत या प्रदीर्घ कालावधीनंतरही कायम आहे. किल्लारीसह भूकंपग्रस्त सर्वच गावांचे पुनर्वसन झाले आहे. मात्र मूलभूत सुविधांअभावी ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील तीस खेडी पाणीपुरवठा योजना कायम या ना त्या कारणास्तव विस्कळित राहिली आहे. आजही ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नाही. महिना-दोन महिन्यांनी नळांना पाणी येते. त्यामुळे पाणीप्रश्न कायम आहे.

कबालेंचा प्रश्न कायम

आठव्या आणि नवव्या फेरीतील कबाले (जागेचा मालकी हक्क) वाटपाचा प्रश्न सुटलेला नाही. बसस्थानकाची घोषणा झाली; पण ती अधांतरीच आहे. तालुकास्तरीय सर्व शासकीय उपकार्यालये एकत्र असावीत यासाठी खुली जागा राखीव ठेवलेली आहे. तेथे तालुक्यातील विविध शासकीय उपकार्यालये कार्यान्वित व्हावीत, रोजगाराच्या संधीही उपलब्ध कराव्यात, भूकंपग्रस्तांचा शासकीय नोकरीतील अनुशेष भरून काढण्यासाठी कायम ओरड सुरू आहे. हा प्रमुख मुद्दा शासनाने प्राधान्याने मार्गी लावावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

नागरी सुविधांचा अभाव

किल्लारीसह लामजना, मोगरगा, मंगरूळ, गुबाळ, नांदुर्गासह भूकंपग्रस्त अन्य गावांतर्गत रस्ते मुरूम, दगड, मातीचे बनविले होते. त्यांचे डांबरीकरण झालेले नाही. आज या रस्त्यांवर चालणेही कठीण आहे. बावन्न गावांतील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करण्याची मागणी कायम आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, खासदार ओमराजे लिंबाळकर यांनी लक्ष घालून या समस्या सोडवाव्यात अशी भूकंपग्रस्तांची माफक अपेक्षा आहे.

भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन झाले; पण अपुऱ्या सुविधांमुळे या भागात येणाऱ्या कर्मचारी वर्गाला ये-जा करावी लागते. मूलभूत गरजांच्या पूर्तीसह शैक्षणिक दर्जा वाढीसाठीही प्रयत्न व्हावेत, उपक्रम राबवावेत.

- सतीश भोसले, मुख्याध्यापक. किल्लारी.

loading image
go to top