जीएसटीनंतर सीजीएसटीचे 21 हजार नवे करदाते वाढले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

औरंगाबाद - देशात जीएसटी लागू झाल्यानंतर करदात्यांच्या संख्येत भर पडली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत जीएसटीनंतर 21 हजार नव्या करदात्यांची भर पडली आहे. आता 32 हजार 233 करदाते असून, महसुलातही मोठी वाढ झाल्याची माहिती केंद्रीय वस्तू व सेवाकराचे संयुक्‍त आयुक्‍त अशोक कुमार यांनी "सकाळ'ला दिली. 

औरंगाबाद - देशात जीएसटी लागू झाल्यानंतर करदात्यांच्या संख्येत भर पडली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत जीएसटीनंतर 21 हजार नव्या करदात्यांची भर पडली आहे. आता 32 हजार 233 करदाते असून, महसुलातही मोठी वाढ झाल्याची माहिती केंद्रीय वस्तू व सेवाकराचे संयुक्‍त आयुक्‍त अशोक कुमार यांनी "सकाळ'ला दिली. 

ता. एक जुलै 2017 पासून देशभरात जीएसटी लागू झाला. जीएसटीपूर्वी केंद्रीय जीएसटी कार्यालयाकडे 10 हजार 654 करदाते होते. जीएसटीनंतर त्यात 21 हजार 571ची भर पडली. जीएसटीपूर्वी सप्टेंबर ते ऑक्‍टोबर 2016 यादरम्यान राज्य जीएसटी आणि केंद्रीय जीएसटी कार्यालयाचे 400 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. डिसेंबर 2016 पासून सेंट्रल एक्‍साईज, सर्व्हिस टॅक्‍सचे जीएसटीमध्ये रूपांतर करण्यास प्रारंभ झाला. डिसेंबर 2016, जानेवारी ते मार्च 2017 पर्यंत हे काम चालले. एप्रिल 2017 पासून व्यापारी, उत्पादक, सेवाकरदाते यांच्या बैठका, कार्यशाळा घेऊन त्यांना जीएसटीबद्दल मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील 76 तालुक्‍यांत शिबिरे झाली. ता. तीन ते 18 मे दरम्यान औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. याचवेळी 25 जीएसटी सेवा केंद्रांच्या माध्यमातून व्यापारी, करदात्यांच्या अडचणी सोडविण्यात आल्या. यानंतर सप्टेंबर ते नोव्हेंबर 2017 दरम्यान लघू, सूक्ष्म आणि मध्यम उद्योजकांसाठी मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली. व्यापारी, करदात्यांकडून आलेल्या अडचणी आणि सूचना या जीएसटी कौन्सिलकडे पाठविण्यात आल्या असल्याचेही अशोक कुमार यांनी सांगितले. 

दहा कोटी ई- वे बिल तयार 
जीएसटीप्रमाणे ई- वे बिलाच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय जीएसटी कार्यालयाने फेब्रुवारी 2018 पासून तांत्रिक बाबींवर काम करण्यास सुरवात केली. ता. एक एप्रिलपासून आंतरराज्य ई- वे बिल प्रणाली लागू झाली, तर ता. एक जूनपासून राज्य अंतर्गत ई- वे बिल प्रणाली लागू झाली. आतापर्यंत दहा कोटींपेक्षा जास्त ई- वे बिल तयार झाले आहेत. यासाठी प्रत्येक ठिकाणी शिबिरे घेण्यात आली असल्याचेही श्री. कुमार यांनी सांगितले. 

Web Title: 21 thousand new CGT taxpayers increased