'सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्‍ट'साठी शेंद्रा येथे 250 कोटींचा प्रस्ताव

आदित्य वाघमारे
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

कन्व्हेंशन सेंटर, एक्‍झिबिशन सेंटरसाठी 50 एकर जागा 

औरंगाबाद - सीबीडी अर्थात सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्‍टसाठी ऑरिकमध्ये 50 एकर जागा राखीव ठेवण्यात आली आहे. ऑरिक हॉल परिसरात असलेल्या या जागेत विविध सुविधा उभारण्यासाठी 250 कोटींचा प्रस्ताव औरंगाबाद इंडस्ट्रिअल टाऊनशिपकडे तयार असून, तो लवकरच केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठवला जाणार असल्याची माहिती सहसरव्यवस्थापक गजानन पाटील यांनी 'सकाळ'ला दिली. 

'ऑरिक'च्या उभारणीस सुरवात करतानाच सेंट्रल बिझनेस सेंटरच्या उभारणीसाठीचा विषय चर्चेला आला होता. सेंट्रल बिझनेस सेंटरच्या उभारणीसाठी यावेळी पन्नास एकर जागा राखीव ठेवण्यात आली आहे. या जागेचा भाग वापरूनच ऑरिक हॉलची उभारणी करण्यात आली आहे. ऑरिकमधील या पाच मजली प्रशासकीय इमारतीला लागूनच आता सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्‍टचा (सीबीडी) प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यासाठी पन्नास एकर जागा ही राखीव ठेवण्यात आली असून, त्यावर इमारतींसह मोठे प्रदर्शन लावता येण्यासाठी मोठ्या जागा विकसित केल्या जाणार आहेत. यामध्ये एक्‍झिबिशन सेंटर, कन्व्हेंशन सेंटर, व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून मोकळी ठेवलेली जागा आणि प्रदर्शन लावण्यासाठी खुल्या जागांचा विकास करण्याच्या दृष्टीने 250 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव औरंगाबाद इंडस्ट्रिअल टाऊनशिपकडे तयार असल्याची माहिती "ऑरिक'तर्फे "सकाळ'ला देण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 250 crore proposal for CBD at Shendra