परभणी जिल्ह्यातील ३२६ शाळा सुरु, दहावी-बारावीच्या वर्गांना सुरुवात 

सकाळ वृतसेवा 
Wednesday, 2 December 2020

परभणी जिल्ह्यातील शाळांमध्ये बुधवारी (ता.दोन) सुरु झालेल्या दहावी व बारावीच्या वर्गांना विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी होते. माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वंदना वाहुळ यांनी बुधवारी मानवत येथील विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांची संवाद साधला. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील जिल्हा परिषेद प्रशालेत आलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. 

परभणी ः जिल्ह्यातील शाळांमध्ये बुधवारी (ता.दोन) सुरु झालेल्या दहावी व बारावीच्या वर्गांना विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी होते. परंतू, एक उत्साहवर्धक, आशादायक वातावरण मात्र निर्माण झाले आहे. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचे स्क्रीनींग करून उत्साहात स्वागत केले तसेच विद्यार्थ्यांना मास्कचे देखील वाटप करण्यात आले. 

कोरोना संसर्गामुळे गेल्या पाच महिण्यापासून बंद असलेल्या शाळांमधील दहावी-बारावीच्या वर्गांना बुधवारी उत्साहात सुरुवात झाली. महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यात ३९९ शाळा सुरु होणे अपेक्षीत होते. परंतू, जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी सर्व शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर टेस्टचे अहवाल आल्याशिवाय शाळा सुरु करु नये, अशी सूचना केल्यामुळे काही शाळा उघडण्याची शक्यता कमी आहे. परंतू, ज्या शाळा सुरु झाल्या तेथे विद्यार्थी संख्या कमी असली तरी शाळांची उपस्थिती वाढण्याची शक्यता अधिक आहे. बारावीच्या वर्गांना नियमित उपस्थिती देखील कमीच असते. दहावीचे नियमित वर्ग मात्र पुर्ण क्षमतेने चालतात. त्यामुळे येत्या काही दिवसात या वर्गांची संख्या वाढण्याची शक्यता अधिक आहे. 

शाळांनी केले सुरक्षा नियमांचे पालक 
प्रशासनाच्या सुचनेनुसार बहुतांश शाळांनी कोरोना सुरक्षा नियमांच्या अनुषंगाने पुर्वतयारी केली होती. शाळा, वर्गखोल्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. शाळा सुरु झाल्यावर देखील येणाऱ्या शिक्षक, विद्यार्थ्यांचे स्क्रीनींग केल्या गेले. पालकांचे संमतीपत्रे संकलीत करण्यात आली. विद्यार्थ्यांना ताप, सर्दी, खोकला आदी विषयी देखील काही ठिकाणी चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा - Osmanabad Corona Update: उस्मानाबाद जिल्ह्यात २६ जणांना कोरोनाची लागण

पिंगळी येथे मास्कचे वाटप 
पिंगळी येथील जिल्हा परिषद शाळेत बुधवारी दहावीच्या वर्गाला सुरुवात झाली. ३९ पैकी १७ विद्यार्थी उपस्थीत होते. यावेळी उपस्थिती मुख्याध्यापक, शिक्षक, महिला शिक्षकांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. 

हेही वाचा - उमरगा: कोथिंबीरच्या दराचा झाला पालापाचोळा! मुदलात घाटा होत असल्याने शेतकरी हतबल -

जिल्ह्यातील शाळांमध्ये उत्साहवर्धक चित्र - डॉ. वाहुळ 
जिल्ह्यातील बहुतांश शाळा सुरु झाल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहुळ यांनी दिली. आपण स्वतः मानवत तालुक्यातील तीन शाळांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने संख्या ठिकठिक, समाधानकारक होती. सौ.शकुंतलाबाई कत्रुवार विद्यालयात ६२, के.के.एम.महाविद्यालयात ५६, जिल्हा परिषद शाळेतही विद्यार्थी-विद्यार्थीनी होत्या. तेथे विद्यार्थींनीची संख्या अधिक होती. क्लासरुम टिचींग जास्त चांगले, परिणामकारक आहे,अडचणी येत नाही, अशा भावना देखील विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्याची माहिती डॉ. वाहुळ यांनी दिली. खासगी शाळांसह जिल्हा परिषदेच्या शाळांना देखील प्रतिसाद चांगला मिळाला. काही पालक कुंपनावर आहेत. एक-दोन दिवस जाऊ द्या, नंतर पाठवू असा विचार करीत असल्याचे दिसून येते. परंतु एकंदरीत उत्साहवर्धक चित्र आहे. लवकरच सर्व विद्यार्थी शाळेत येतील व शाळा पुन्हा गजबजतील असा विश्वास असल्याची भावना देखील डॉ. वाहुळ यांनी व्यक्त केली. 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 326 schools started in Parbhani district, 10th-12th classes started, Parbhani News