बीड जिल्ह्यात पोलिसांच्या मदतीला ३३० शिक्षक, नाकाबंदीचे करणार काम 

प्रवीण फुटके 
Saturday, 23 May 2020

मागच्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे ३५ रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णांच्या गावासह तीन किलोमीटर अंतर परिसरातील गावे कंटेनमेंट झोन जाहीर केली जातात. त्यामुळे या गावांत पूर्णवेळ बंद व संचारबंदी असते. त्याचे काम पोलिसांवर वाढले. यासाठी पोलिस दलाचे मनुष्यबळ कमी पडत असल्याने आता त्यांना मदतीला शिक्षक द्यावेत, अशी मागणी पोलिस दलाकडून झाली.

परळी वैजनाथ (जि. बीड) - जिल्ह्यात लॉकडाउन आणि संचारबंदीची अंमलबजावणी करतानाच आता कोरोना रुग्ण वाढत असल्याने रुग्णांच्या गावांसह इतर परिसर कंटेनमेंट झोन जाहीर केला जात आहे. यामुळे पोलिसांचे काम अधिकच वाढले आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या मदतीला शिक्षक धावले आहेत. 

जिल्हा परिषदेचे ३३० शिक्षक पोलिसांच्या सोबतीने काम करणार आहेत. मात्र, या शिक्षकांना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नसलेल्या ठिकाणीच कामे दिली जाणार आहेत. नाकाबंदी व चेकपोस्ट आदी ठिकाणी आता हे शिक्षक पोलिसांना मदत करणार आहेत. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सुरवातीला संचारबंदी व नंतर लॉकडाउन जाहीर करण्यात आले. त्यामुळे नियमित कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याबरोबरच गुन्ह्यांचा तपास या नियमित कामांबरोबरच वरील दोन नियमांची अंमलबजावणी आणि या काळातील अवैध दारू व इतर कामे पोलिसांच्या मागे लागली.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...

आता मागच्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे ३५ रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णांच्या गावासह तीन किलोमीटर अंतर परिसरातील गावे कंटेनमेंट झोन जाहीर केली जातात. त्यामुळे या गावांत पूर्णवेळ बंद व संचारबंदी असते. त्याचे काम पोलिसांवर वाढले. यासाठी पोलिस दलाचे मनुष्यबळ कमी पडत असल्याने आता त्यांना मदतीला शिक्षक द्यावेत, अशी मागणी पोलिस दलाकडून झाली. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ३३० शिक्षकांना पोलिसांच्या सोबतीला दिले आहे. पोलिस ठाण्याच्या नजीक राहणाऱ्या शिक्षकांच्याच यासाठी नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांनाही येण्या - जाण्याच्या फार अडचणी होणार नाहीत. या शिक्षकांना केवळ नाकाबंदी व चेकपोस्ट या ठिकाणीच काम करावे लागणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचे कुठलेही काम शिक्षकांवर सोपविले जाणार नाही. 

ठाणेनिहाय नेमणुका 
जिल्ह्यातील २७ पोलिस ठाण्यांसाठी ३३० शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. या नेमणुकाही ठाणेनिहाय करण्यात आल्या आहेत. ठाण्याच्या अंतर्गतचे चेकनाके व कंटेनमेंट झोन परिसरातील नाकेबंदीची कामे या शिक्षकांना करावी लागतील. 

पोलिस दलाच्या मागणीप्रमाणे आम्ही शिक्षकांची यादी दिली आहे. गैरसोय होऊ नये म्हणून पोलिस ठाण्याच्या नजीकच्या रहिवासी असलेल्या शिक्षकांचीच नेमणूक केली आहे. 
- अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद. 

शिक्षकांमुळे मोठी मदत होणार आहे. शिक्षकांना केवळ चेकपोस्ट व नाकाबंदी अशीच कामे दिली जातील. कायदा व सुव्यवस्थेचे कुठलेही काम दिले जाणार नाही. 
- विजय कबाडे, अपर पोलिस अधीक्षक, बीड. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 330 teachers with the help of police in Beed district