esakal | हिंगोलीत ३५ अंगणवाड्यांना मिळणार हक्काची इमारत
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हिंगोली जिल्ह्यात नवीन ३५ अंगणवाड्यांचे बांधकाम, तर १५२ अंगणवाड्यांच्या किरकोळ दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून चार कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी नियोजन विभागाकडे अहवाल पाठविला आहे. त्यानुसार तीन कोटी रुपयांचानिधी मंजूर झाला असून पावसाळ्याच्या तोंडावर ही कामे पूर्ण केली जाणार आहेत.

हिंगोलीत ३५ अंगणवाड्यांना मिळणार हक्काची इमारत

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

 हिंगोली : जिल्ह्यातील बहुतांश अंगणवाड्यांची दुरवस्था झाली असून काही अंगणवाड्यांना तर स्वतःच्या इमारतही नाही. तसेच किरकोळ दुरुस्तीअभावी बालकांना मोकळ्या जागेत धडे देण्याची वेळ आली आहे. त्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने ३५ नवीन अंगणवाड्यांच्या किरकोळ दुरुस्तीसाठी नियोजन विभागाकडे चार कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यात वार्षिक नियोजनमधून तीन कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाल्याची माहिती महिला बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी दिली.

जिल्ह्यात एक हजार ८९ अंगणवाड्या असून या शहरी व ग्रामीण भागात चालविण्यात येतात. यात शून्य ते पाच वर्षांपर्यंतच्या एक लाखा पेक्षा अधिक बालकांचा समावेश आहे. अंगणवाडीतील बालकांचे कुपोषण दूर करण्यासाठी केंद्र शासन व युनिसेफकडून पोषण आहार पुरवठा केला जातो.

हेही वाचाअबब... ८४ प्रकल्प गाळमुक्त

अंगणवाड्यांचे बांधकाम जागेअभावी ठप्प

जिल्ह्यात एक हजार ८९ अंगणवाड्यांपैकी ९६४ अंगणवाड्या स्वतःच्या इमारतीत चालतात. उर्वरित १२५ अंगणवाड्यांपैकी काही किरकोळ दुरुस्तीअभावी, तर काही अंगणवाड्यांचे बांधकाम जागेअभावी ठप्प पडले आहे. शहरी भागातील अंगणवाड्यांना कायमस्वरूपी जागा नसल्यामुळे अंगणवाड्या किरायाच्या खोल्यांमध्ये चालतात. 

ग्रामपंचायतीच्या खोल्यांत भरते अंगणवाडी

ग्रामीण भागातील काही अंगणवाड्या ग्रामपंचायतीच्या खोल्यांत भरविण्यात येतात.
अंगणवाड्यांना हक्काची इमारत राहावी, यासाठी जिल्हा परिषदेचे ‘सीईओ’ राधाबिनोद शर्मा, अतिरिक्त ‘सीईओ’ डॉ. मिलिंद पोहरे, धनवंतकुमार माळी, सभापती रूपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी प्रयत्न चालविले आहेत. 

नियोजन विभागाकडे पाठविला अहवाल

यासाठी श्री. वाघ यांनी नवीन ३५ अंगणवाड्यांचे बांधकाम, तर १५२ अंगणवाड्यांच्या किरकोळ दुरुस्तीसाठी २०१९-२० जिल्हा वार्षिक योजनेतून चार कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी नियोजन विभागाकडे अहवाल पाठविला आहे. यातील तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 

ई निविदा प्रक्रिया पूर्ण होताच बांधकाम 

आता ई निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच किरकोळ दुरुस्तीची कामे अंगणवाड्या सुरू होण्यापूर्वी केले जाणार आहेत. अडीच महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन, आचारसंहिता असल्याने कामे ठप्प पडली होती. ई निविदा प्रक्रिया पूर्ण होताच बांधकाम हाती घेतले जाणार असल्याचे श्री. गणेश वाघ यांनी सांगितले.

अंगणवाड्यांत विविध उपक्रम

अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार दिला जातो. तसेच बालकांप्रमाणे गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुलींदेखील काळजी घेतली जाते. गणवाडीताईंकडून दर महिन्याला लसीकरण, वजन, दंड घेर घेतले जातात. कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी ग्राम बाल विकास केंद्रातून वेळोवेळी तपासणी केली जाते.

विविध साहित्य उपलब्ध

जिल्ह्यात एक हजार अंगणवाड्या असून वसमत एकात्मिक बाल विकास केंद्रांर्गत २२३, हिंगोली १८९, कळमनुरी १६६, आखाडा बाळापूर १४४ व औंढा नागनाथ १६७ अंगणवाड्या येतात. 

येथे क्लिक करालॉकडाउनमुळे दोन महिन्यानंतर दरवळतोय सुंगध -

विविध खेळाच्या माध्यमातून धडे

तत्कालीन महिला बालकल्याण अधिकारी तृप्ती ढेरे यांच्या काळात बालकांना पालक, दानशूरांच्या मदतीने बसण्यासाठी पट्ट्या, रॅक, खेळणी आदी साहित्य उपलब्ध करून दिले होते. काही अंगणवाड्यांच्या भिंती बोलक्या झाल्या होत्या. यामुळे बालके घरी न राहता अंगणवाडीत येऊन विविध खेळाच्या माध्यमातून धडे घेत होते.


किरकोळ दुरुस्तीसाठी निधी मंजूर

जिल्‍ह्यात ३५ नवीन अंगणवाड्या व इमारतींच्या किरकोळ दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर दुरुस्तीचे कामे पूर्ण करून घेणार आहे. तसेच लोकसहभागातून बालकांना साहित्य उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
- गणेश वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी