उमरगा पालिकेत 49 लाखांचा अपहार; पाच जणांवर गुन्हा

अविनाश काळे
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

उमरगा पालिकेत विविध विभागात झालेल्या आर्थिक अपहारप्रकरणी शनिवारी (ता. 31) पहाटे उमरगा पोलिस ठाण्यात पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. या अपहाराची रक्कम 49 लाख 800 इतकी आहे.

उमरगा : उमरगा पालिकेत विविध विभागात झालेल्या आर्थिक अपहारप्रकरणी शनिवारी (ता. 31) पहाटे उमरगा पोलिस ठाण्यात पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. या अपहाराची रक्कम 49 लाख 800 इतकी आहे.

याबाबतची प्राप्त माहिती अशी की, उमरगा पालिकेत विविध योजनेत अपहार झाल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. पालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील या प्रकरणाची फाईल्स, कागदपत्रे घेऊन पोलिस ठाण्यात उशीरापर्यत होते. दलितोत्तर योजनेच्या निधीसह अन्य काही विभागात अपहार झालेला आहे.

पालिकेचे स. लेखापाल विनायक वडमारे, दोन कंत्राटी कर्मचारी धम्मपाल ढवळे, सूरज चव्हाण यांच्यासह सचिन काळे, पवन मात्रे -सोमवंशी अशा पाच जणांचा या अपहारात व्यवहारात समावेश आहे.  

गुंजोटी (ता. उमरगा) येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत परस्पर खाते काढून बनावट सह्या वापरून धनादेशाद्वारे संबंधितांनी संगनमत करून हा अपहार झाला आहे.  मुख्याधिकारी पाटील यांनी या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी केली असता बनावट स्वाक्षरी, बँक खाते उमरगा शाखेऐवजी गुंजोटी शाखा येथे काढण्याचा प्रकार दिसून आला.

उमरगा येथील स्टेट बँकेतही धनादेशाद्वारे बनावट स्वाक्षरीने रक्कम काढण्यात आल्याचे दिसून आले. शनिवारी पहाटे  दोन वाजता या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, उमरगा पालिकेच्या स्थापनेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका मोठा गैरव्यवहार झाल्याची चर्चा होत आहे.

पालिकेतील अनेक प्रकरणात अनियमितता तसेच लेखापरिक्षणा ओढलेले ताशेरे या सर्व बाबीच्या अनुषंगाने आणखी बराच गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यात कोण कोण सहभागी असतील याची मात्र प्रतिक्षा करावी लागेल. या प्रकरणी मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी प्राधिकृत केलेले लेखापाल अंकुश माने यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. 

धडकी आणि चर्चा - दरम्यान, या प्रकरणाची शहरात दोन दिवसांपासून, चर्चा सुरू होती. या प्रकरणात कोणकोण सहभागी आहेत याची सर्वाधिक उत्सुकता नगरसेवकांना लागली होती. एक- दोघे मात्र दिसत नव्हते. मोठ्या चलाखीने केलेल्या अपहार प्रकरणात " हम पाच " असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतू अप्रत्यक्ष "हम साथ- साथ" किती आहेत याची सखोल माहिती तपासणी अंती होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 49 lakhs scam in Umarga Municipality; A crime on five people