हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासनाची दमछाक

राजेश दारव्हेकर
Tuesday, 15 December 2020

विशेष म्हणजे सध्या कोरोनाचे संकट ओसरले नसून अनेक कर्मचाऱ्यांच्या मध्यंतरी बदल्याही झाल्या आहेत. त्यामुळे अचानक ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे प्रशासनाचीही दमछाक होत आहे.

 

हिंगोली : जिल्ह्यातील ४९५ ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. २३ ते ३० डिसेंबर दरम्यान उमेदवारांना ऑनलाईनद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करावा लागणार आहे. उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया अवघ्या नऊ दिवसांवर आली असून त्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र जुळवा जुळव करण्याची लगबग सुरु झाली असून दिलेल्या मुदतीत ही प्रक्रिया तक्रारी पूर्ण पार पाडण्याकरीता प्रशासनाचीही दमछाक होत आहे.

हिंगोली जिल्ह्यातील ४९५ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. ज्यामध्ये हिंगोली तालुक्यात ९५, सेनगाव तालुक्यात ९७, कळमनुरी तालुक्यात १०९, औंढा नागनाथ तालुक्यात ८८ आणि वसमत तालुक्यात १०६ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. नऊ डिसेंबरच्या सुधारीत कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी सोमवार (ता. १४ ) डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली तर  मंगळवारी (ता. १५ डिसेंबरला) तहसील कार्यालयात निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.  २३ ते ३० डिसेंबर दरम्यान सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागविण्याचा व सादर करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे .

३१ डिसेंबरला नामनिर्देशन पत्राची छाननी होणार असून (ता.०४)  जानेवारी २०२१ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिवस तर चार जानेवारीला निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. (ता.१५) जानेवारी प्रत्यक्ष मतदान तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने अचानक ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांची चांगलीच धांदल उडत आहे .

निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रासोबत जातपडताळणीकडे सादर केलेल्या अर्जाची पोचपावती व हमीपत्र द्यावे लागणार. तसेच इतर आवश्यक कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी दमछाक होत आहे. विशेष म्हणजे सध्या कोरोनाचे संकट ओसरले नसून अनेक कर्मचाऱ्यांच्या मध्यंतरी बदल्याही झाल्या आहेत. त्यामुळे अचानक ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे प्रशासनाचीही दमछाक होत आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 495 Gram Panchayat elections will be held in Hingoli district