esakal | लातुरात बांधावरील ५० चंदनाच्या झाडांची चोरी!
sakal

बोलून बातमी शोधा

tree theft

लातुरात बांधावरील ५० चंदनाच्या झाडांची चोरी!

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (लातूर): उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गंभीर घरफोडी व चोऱ्यांचे सत्र सुरू झाले आहे. असे असतानाच गुरुवारी (ता.१५) व शुक्रवारी (ता.१६) मध्यरात्री दावणगाव (ता. उदगीर) येथील एका शेतकऱ्याच्या बांधावरील तब्बल ५० चंदनाची झाडे अज्ञात चोरट्यांनी तोडून नेली आहेत. यात सदरील शेतकऱ्याला तीन लाख रुपयांना तोटा झाल्याचे सांगितले आहे. ग्रामीण पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शेतकरी भंडे (वय- ४७) यांची दावणगाव शिवारातील शेतातील बांधावरील चंदनाची ५० झाडे दोन रात्रीत अज्ञात चोरट्याने तोडून नेली आहेत. या प्रकरणी शेतकरी श्री. भंडे यांच्या फिर्यादीवरून येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत अनेक गंभीर घरफोडी व चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वीही चांदेगाव येथे १४ तोळे सोने, ११ तोळे चांदीसह लाखो रुपयांची घरफोडी झाली होती. शनिवारी (ता.१८) पहाटेही देगलूर रोड येथील एका मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: उस्मानाबाद जिल्ह्याची ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्तीकडे वाटचाल

अठरा हजारांचा मुद्देमाल जप्त
चांदेगाव पाटीजवळ शनिवारी (ता.१६) सायंकाळी साडे तीनच्या सुमारास एका दुचाकीवरून देशी दारूच्या ४८ सीलबंद बाटल्यांची अवैधपणे विक्री करण्यासाठी वाहतूक केली जात होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी सदर दुचाकीचालकाकडून दारूसह एकूण १७ हजार ८८० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तुळशीराम बरूरे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी हिरामण गायकवाड (वय-२८, रा. कोदळी) विनायक गायकवाड (वय-२६, रा.कासराळ) यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image