esakal | अब्दुल सत्तारांमुळे मिळणार शिवसेनेला आयतेच बळ
sakal

बोलून बातमी शोधा

अब्दुल सत्तार

माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी हातामध्ये शिवबंधन
बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे आता सिल्लोड-सोयगाव विधानसभेच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळणार आहे. त्याचबरोबर श्री. सत्तार भाजपमध्ये जाणार असल्याच्या तीन महिन्यांपासूनच्या चर्चेवर पडदा पडला आहे.

अब्दुल सत्तारांमुळे मिळणार शिवसेनेला आयतेच बळ

sakal_logo
By
सचिन चोबे


सिल्लोड (जि.औरंगाबाद) : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी हातामध्ये शिवबंधन
बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे आता सिल्लोड-सोयगाव विधानसभेच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळणार आहे. त्याचबरोबर श्री. सत्तार भाजपमध्ये जाणार असल्याच्या तीन महिन्यांपासूनच्या चर्चेवर पडदा पडला आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थांसह सहकारामध्ये तालुक्‍यात नामोनिशान नसलेल्या शिवसेनेचा नगर परिषदेसह कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भगवा फडकणार आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सत्तारांच्या पक्षप्रवेशास विरोध केल्यानंतर दिवसागणिक पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण आले होते. महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिल्लोडला आले असताना भाजप व सत्तार यांच्या
पदाधिकाऱ्यांमध्ये स्वागत स्थळावरून वादाची ठिणगी पडली होती.

परंतु, ऐनवेळी सत्तार यांनी महाजनादेश यात्रेच्या नियोजनात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्याचे मान्य करून स्वागतस्थळ तयार केले. येथे सत्तारांनी मोठे शक्तिप्रदर्शन करून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांना रथाखाली येण्याची गळ घातली असता फडणवीस यांनी सत्तारांनाच रथावर बोलावून घेतले. सत्तार रथावर चढताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना हात दिला व त्याचीही सर्वत्र चर्चा रंगली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा फड रंगण्यास सुरवात झाली असताना वेळेचा विचार करून सत्तारांनी मुंबईत थेट मातोश्री गाठून शिवबंधन बांधून केलेला शिवसेना प्रवेश म्हणजे भाजपसाठी डोकेदुखी ठरणारा आहे. सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघ हा पूर्वापार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मानणारा आहे. त्यामुळेच भाजपने या मतदारसंघावर पंधरा
वर्षे सत्ता गाजविली. माजी आमदार दिवंगत किसनराव काळे यांच्या रूपाने या मतदारसंघावर भाजपने ताबा मिळविला होता. अस्सल ग्रामीण बाज व कार्यकर्त्यांशी जोडली गेलेली थेट नाळ यामुळे काळेंनी राजकारणातील मातब्बर दिवंगत माणिकराव पालोदकर यांना पराभूत केले होते.

सलग दहा वर्षे आमदारकी भूषविलेल्या काळेंना वरिष्ठांची नाराजी भोवली. त्यांच्या जागी सांडू पाटील लोखंडे यांना पक्षाने उमेदवारी दिली. पक्षाचे कार्य करताना तालुकाध्यक्षपद भुषविलेले सांडू पाटील लोखंडे हे अवघ्या तीनशे एक मतांनी विजयी झाले. आमदारकीची लॉटरीच त्यांना लागली. त्यानंतरच्या दोन पंचवार्षिकमध्ये अब्दुल सत्तारांनी भाजपच्या सुरेश बनकरांना पराभूत करीत आमदारकी मिळविली. भाजपचा गड मानला जाणारा विधानसभा मतदारसंघ त्यांनी खेचून घेतला व ताब्यातही ठेवला.

किसनराव काळे आमदार झाल्यानंतर त्यांनी याठिकाणी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा जम बसू दिला नव्हता. तालुक्‍यात शिवसेनेचे राजकीय अस्तित्व बोटावर मोजण्याइतकेच आहे. आता आमदार अब्दुल सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशामुळे जी
परिस्थिती भाजप आमदारांच्या काळात शिवसेनेची होती ती आता भाजपची होणार
असल्याची चर्चा तालुक्‍यातील जाणकार करीत आहेत. सत्तार शिवसेनेत गेल्याने
शिवसेनेच्या ताब्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारातील संस्था यामुळे तालुक्‍यात शिवसेनेच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होईल.

भाजपच्या गोटात शांतता

दिवंगत आमदार किसनराव काळे यांच्यानंतर भाजपमध्ये एकहाती नेतृत्व न राहिल्यामुळे या पक्षात नेत्यांची फळी तयार झाली. दोन विधासभा निवडणुकीत भाजपला पत्करावा लागलेला पराभव हा एकहाती नेतृत्व न राहिल्याचाच परिणाम होता. यामुळे भाजपचा कार्यकर्ता भरडला गेला. भाजप नेत्यांनीही सोयीनुसार कार्यकर्त्यांचा वापर करीत गटातटाचे राजकारण केले. आता सत्तारांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपच्या गोटात शांतता पसरल्याचे दिसते.

शिवसेनेच्या तंबूत उत्साह

अब्दुल सत्तारांची मतदारसंघावर पकड आहे. त्यांच्या ताब्यातील सिल्लोड नगर परिषदेतील नगराध्यक्षांसह चोवीस नगरसेवक, जिल्हा परिषदेचे तीन सदस्य, पंचायत समितीच्या सात सदस्यांचे बळ शिवसेनेला मिळणार आहे. साहजिकच शिवसेनेच्या तंबूत उत्साहाचे वातावरण आहे.
 

loading image
go to top