औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय मार्गावरील अपघात चिंताजनक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad- solapur national highway

स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडण्याचे साधन नाही. शिवाय सर्व्हिस रोडही नसल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. महामार्गालगतच्या नागरिकांसाठी ही चिंतेची बाब आहे

औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय मार्गावरील अपघात चिंताजनक

उस्मानाबाद: औरंगाबाद- सोलापूर महामार्गावरील काही ठिकाणे अपघाताचे हब होत आहे. स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडण्याचे साधन नाही. शिवाय सर्व्हिस रोडही नसल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. महामार्गालगतच्या नागरिकांसाठी ही चिंतेची बाब आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती झाल्यानंतर या मार्गावर वाहतूक सुसाट झाली आहे. शिवाय महामार्ग गुळगुळीत झाल्याने येथील वाहतूकही वाढली आहे. ही बाब जरी कौतुकास्पद असली तरी याचे काही दुष्परिणामही जाणवू लागले आहेत. अपघाताची संख्या कमी झाली असली तरी त्या अपघाताची तीव्रता वाढली आहे. अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढणे चिंताजनक आहे.

का घडतात अपघात?

उस्मानाबाद शहरातून लातूरकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. यातच या मार्गावरील आळणी फाटा येथे अंडरपासची सुविधा नाही. विशेष म्हणजे हा जिल्हा मार्ग असतानाही येथे अंडरपास नसल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या कारभारावर आश्चर्य व्यक्त होत आहे. ज्या ठिकाणी अंडरपास अत्यावश्यक आहेत, अशा अनेक ठिकाणी अंडरपास काढण्यात महामार्ग प्राधिकरणाला अपयश आल्याचे दिसून येत आहे. याशिवाय उस्मानाबाद शहराच्या लगतही काही ठिकाणी अशीच स्थिती आहे. लोहाऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे. नको त्या ठिकाणी ठिकाणी अंडरपास केल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे. उस्मानाबाद तालुक्यातील बावीपाटी या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याकडे जाण्याचा मार्ग आहे. या ठिकाणी ऊस वाहतुकीच्या ट्रक, ट्रॅक्टर जातात. अशा ठिकाणी अंडरपास असणे अपेक्षित आहे. मात्र याकडेही दुर्लक्ष झाले आहे.

सर्व्हिस रोडचा अभाव

राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहने वेगाने जाणे साहजिकच असते. मात्र त्यासाठी स्थानिक शेतकरी, नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आहे. केवळ राष्ट्रीय महामार्ग आहे, म्हणजे स्थानिक नागरिकांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ नये, अशी प्राधिकरणाची भूमिका योग्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गावरही अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Aurangabad News