भाजीपाला घेऊन घराकडे जाताना निवृत्त शिक्षकाचा अपघातात मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

उभ्या असलेल्या वाहनावर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू केलेली संचारबंदी मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी तीनपर्यंत शिथिल होती. त्यामुळे ते या वेळेत भाजीपाला घेऊन गडबडीत घराकडे निघाले होते.  

अंबाजोगाई (जि. बीड) - भाजीपाला घेऊन घराकडे निघालेल्या निवृत्त शिक्षकाचा मंगळवारी (ता. सात) भगवानबाबा चौकात एका उभ्या असलेल्या वाहनावर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. गोवर्धन मालोजीराव मुंडे (वय ६१) असे अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. 

मूळ गोपाळपूर (ता. धारूर) येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त शिक्षक गोवर्धन मुंडे हे सध्या येथील नागझरी परिसरात वास्तव्यास होते. दोन वर्षापूर्वीच ते रत्नेश्वर विद्यालय टोकवाडी (ता. परळी) या शाळेतून सेवानिवृत्त झाले होते. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू केलेली संचारबंदी मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी तीनपर्यंत शिथिल होती. त्यामुळे ते या वेळेत भाजीपाला घेऊन गडबडीत घराकडे निघाले होते.

हेही वाचा - मृत्यूनंतरही इथे भोगाव्या लागतात मरणयातना... 

त्यांच्या दुचाकीला अडकवलेली पिशवी गाडी वळताना अडकल्याने ते थेट रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या ट्रॅव्हल्सला जाऊन धडकले. त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाची अधिक माहिती घेऊन पंचनामा केला. गोवर्धन मुंडे यांच्यामागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accidental death of retired teacher