esakal | हिंगोलीत पाच रेशन दुकानदारांवर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

swast dhanya karwai

शासन निर्देशानुसार शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित न केल्यामुळे चार स्वस्तधान्य दुकानदार आणि एका किराणा दुकानदारांवर पुरवठा विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आखाडा बाळापूर, पांगरी, कळमनुरी, रेडगाव येथील स्वस्त धान्य दुकानाचा समावेश आहे.

हिंगोलीत पाच रेशन दुकानदारांवर कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : शासन निर्देशानुसार शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित न केल्यामुळे चार स्वस्तधान्य दुकानदार आणि एका किराणा दुकानदारांवर पुरवठा विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे.
यामुळे रेशन दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. 

यामध्ये नामदेव निवृत्ती टापरे (पांगरी), ओमप्रकाश ठमके (आखाडा बाळापूर), प्रकाश बन्सीलाल वर्मा (कळमनुरी), रामराव कांबळे (रेडगाव), श्री दत्त किराणा ॲंड जनरल स्टोअर्स (आखाडा बाळापूर) यांचा समावेश आहे.

हेही वाचाहिंगोलीकरांना दिलासा; कोरोना बाधित रुग्णाचा अहवाल आला निगेटीव्ह

अन्नधान्य मिळाले नसल्याच्या तक्रारी

 दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिधापत्रिकाधारकांची गैरसोय होणार नाही, त्यांना अन्नधान्य प्राप्त होईल, एकही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, तसेच अन्नधान्य मिळाले नसल्याच्या लाभार्थींच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचना

रेशन दुकानदारांनी लभार्थींना हात धुण्यासाठी सॅनिटायझर किंवा हॅंडवॉश उपलब्ध करून द्यावे, वितरण करतांना गर्दी होणार नाही, सामाजिक अंतर राखले जाईल यादृष्टीने उपाययोजना कराव्यात, असे अवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

सहा जणांवर गुन्हे दाखल

हिंगोली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्‍ह्यात आपती व्यवस्‍थापन कायदा लागू आहे. गुरुवारी (ता. १६) शहरातील नफीसखान एआनखान (रा.पलटन), शेख शफिक, उमर फारूख (रा.आजम कॉलनी), राजेश अग्रवाल (शिवाजीनगर), अमोल राजपुत (रा. कोर्टासमोर), फिजाबी शेख (रा. रिसाला बाजार) यांनी दुकान उघडून जिल्‍हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्‍लंघन केल्याप्रकरणी नगर परिषदेचे व्यवस्‍थापक पंडित मस्‍के यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

दीड एकर ऊस जळाला

केंद्रा बुद्रुक : सेनगाव तालुक्यातील जामठी बुद्रुक येथील एका शेतकऱ्याचा दीड एकारातील ऊस शॉर्ट सर्किटने जळून खाक झाल्याची घटना बुधवारी (ता. १५) घडली. सेनगाव तालुक्‍यातील जामठी येथील बबन सरनाईक यांनी दीड एकरात उसाची लागवड केली आहे. 

लोबंकाळलेल्या अवस्‍थेत तारा

त्‍यांच्या शेतातून वीजपुरवठा करणाऱ्या तारा गेल्या आहेत. तारा त्‍यांच्या शेतात लोबंकाळलेल्या अवस्‍थेत आहेत. हवा आली की त्‍याचे एकमेंकाना घर्षण होते. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हवेमुळे तारेचे घर्षण होऊन आगीची ठिगणी पडल्याने उसाच्या पिकाने पेट घेतला.

दीड लाखाचे नुकसान

 ही आग विझविण्याचा प्रयत्न श्री. सरनाईक यांच्यासह शेजाऱ्यांनी केला. मात्र, तोपर्यंत ऊस जळून खाक झाला. यात त्यांचे अंदाजे दीड लाखाचे नुकसान झाले असून पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी श्री. सरनाईक यांनी केली आहे.

गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा

आखाडा बाळापूर : भाटेगाव, येडशी तांडा (ता. कळमनुरी) येथे पोलिसांनी छापा टाकून गावठी दारू जप्त केली. या प्रकरणी दोघांवर गुरुवारी (ता. १६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथे क्लिक कराव्हिडिओ: लघू, शेतीवर आधारित उद्योग सुरू व्हावेत: आनंद निलावार

दारू गाळप करून विक्री

 पोलिस निरीक्षक विकास थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर, जमादार भगवान वडकिले, शेख बाबर, हर्षद पठाण, श्री. चव्हाण यांच्या पथकाने छापा भाटेगाव येथे टाकला. यामध्ये देविदास लालजी आडे हा दारू गाळप करून चोरटी विक्री करत असल्याचे आढळून आले.

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 साडेपाच हजार रुपये किमतीची गावठी दारू जप्त केली. याशिवाय येडशी तांडा येथे छापा टाकला असता अर्जुन राठोड हा गावठी दारू विक्री करीत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून जमादार भगवान वडकिले पुढील तपास करीत आहेत.