esakal | कळमनुरीत रॅपिड अँटीजन तपासणी न करता व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई

बोलून बातमी शोधा

कोविड टेस्ट

कळमनुरीत रॅपिड अँटीजन तपासणी न करता व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : कोविड आजारा संदर्भात रॅपिड अँटीजेन तपासणी न करता व्यवसाय केल्याप्रकरणी कळमनुरी पालिका व पोलिस प्रशासनाने मंगळवार (ता. २०) कारवाई करीत शहरातील १३ व्यावसायिकाविरोधात दंडात्मक कारवाई करुन त्यांच्याकडून सात हजार शंभर रुपयांचा दंड वसूल केला आहे. मागील काही दिवसानंतर पहिल्यांदाच प्रशासनाकडून रस्त्यावर उतरून कारवाई करण्यात आली आहे.

कोविड आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शासनाकडून संचारबंदी लावण्यात आली आहे. मात्र या संचारबंदीचे अनेक अर्थ काढत व्यावसायिकाकडून आपापल्या पद्धतीने व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घेतला आहे विशेष म्हणजे प्रतिबंध असतानाही अनेकांनी आपला व्यवसाय किंवा दुकाने सुरू ठेवली आहेत या सर्व प्रकाराकडे महसूल, पालिका, पोलिस प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष करून डोळेझाक करण्यात आली आहे.

या सर्व प्रकारानंतर पोलीस प्रशासनाकडून शहरातील जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना सुरू ठेवताना संबंधित व्यवसायिकांनी आपली स्वतःची रॅपिड अँटीजेन तपासणी करून घेण्याचे आवाहन केले होते संबंधित व्यावसायिकांनी आपली आरोग्य तपासणी केल्याशिवाय आपल्या अस्थापना सुरू ठेवू नाहीत असा इशाराही देण्यात आला होता मात्र सर्व काही आलबेल सुरू असल्यामुळे अनेक व्यवसायिकांनी प्रशासनाच्या या सूचनेकडे दुर्लक्ष केले.

दरम्यान मंगळवार (ता. 20) पोलिस निरीक्षक रणजित भोईटे, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, कर्मचारी रामचंद्र जाधव, राजकुमार वरणे, कैलास सातव, प्रशांत शिंदे, शिवाजी देमगुंडे, चंद्रमणी कांबळे, पालिकेचे कर्मचारी सुदर्शन तायडे, राजू साळवे, यांचा समावेश असलेल्या पथकाने बस स्थानक व परिसरामधील मेडिकल स्टोअर, हॉटेल व्यावसायिक व चार फळ विक्रेत्यांकडे आरोग्य तपासणी करून घेतल्याचा पुरावा मागितला.

पोलिस व पालिका प्रशासनाच्या या मोहिमेमध्ये आठ मेडिकल चालक चार फळविक्रेते एक हॉटेल व्यावसायिकाकडे आरोग्य तपासणी संदर्भात कुठलीही कागदपत्र आढळून आली नसल्यामुळे त्यांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड ठोठावला तर विना मास्क फिरणाऱ्या तीन जणांना प्रत्येकी दोनशे रुपयांचा दंड लावून सात हजार शंभर रुपयांचा दंड वसूल केला आहे सुरुवातीला जिल्हा प्रशासन व त्यानंतर शासना कडून लावण्यात आलेल्या संचार बंदी मध्ये पहिल्यांदाच प्रशासनाकडून रस्त्यावर उतरून कारवाई करण्यात आली आहे पालिका व पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईत सातत्य ठेवावे अशी मागणी आता पुढे आली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे