परभणीच्या अन्न औषध प्रशासनाची वसमतमध्ये कारवाई

karwai
karwai

वसमत ः परभणी येथील अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी (ता.दहा) प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या अनुषंगाने वसमत येथे तपासणी केली. यामध्ये शहरात दोन ठिकाणी आठ लाख ४३ हजार ४६८ रुपयांचा गुटखा जप्त करून गोडाऊनला सील करण्यात आले.

परभणी येथील अन्न व औषध प्राशसनातर्फे सोमवारी वसमत येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग अंतर्गत असलेले कॉम्प्लेक्स मधील खालिद शेख यांच्या मालकीच्या गोडाऊन मध्ये प्रतिबंधित गुटखा, पानमसाला असा आठ लाख ३५ हजार ३२८ रुपयांचे अन्नपदार्थ आढळून आले, हे गोडाऊन सील करण्यात आले आहे. सदर गोडाऊन मुझाहेद खान नसीब खान पठाण यांना भाड्याने दिल्याचे खालिद शेख यांनी सांगितले. तसेच त्यांच्या गोडाऊन मध्ये सुद्धा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला आढळून आला. आयुक्तांच्या आदेशान्वये सदर गोडाऊनला सील करण्यात आले.

घराच्या बोळीमध्ये सापडला गुटखा 
दुसऱ्या कारवाईत भागवत बाबुराव मारकोळे यांच्या घरात तपासणी केली असता घराच्या बोळीमध्ये ८१४० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आढळुन आला आहे. दोन्ही कारवाईत एकूण ८,४३,४६८ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला जप्त करण्यात आला. 

गुन्हा नोंदविण्याची प्रक्रीया सुरु 
मुझाहेद खान नसीब खान पठाण व भागवत मारकोळे यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्यानुसार वसमत पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती. कारवाई सह आयुक्त श्री.वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त नारायण सरकटे, अन्न सुरक्षा अधिकारी अनुराधा भोसले, प्रकाश कछवे, अरुण तमडवार यांच्या पथकाने केली.

कळमनुरी बंद प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी
कळमनुरी ः कळमनुरी बंद दरम्यान, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दगडफेक व पेट्रोल भरलेल्या बॉटल फेकण्यास चिथावणी देणाऱ्या दोन आरोपींची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवारी (ता. दहा) या आरोपींना हिंगोली येथील न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ (ता. २०) डिसेंबरला कळमनुरी बंद पाळण्यात आला होता. या बंद दरम्यान, शहरातील युवकांच्या टोळक्याने धुडगूस घालून एसटी महामंडळाच्या गाड्यांची तोडफोड व जाळपोळ करण्याबरोबरच बंदोबस्तावर असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दगडफेक व पेट्रोल भरलेल्या बाटल्या फेकल्या होत्या. याप्रकरणी कळमनुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकूण ३८ आरोपींना अटक करून कारवाई केली होती. मात्र, दगडफेक, पेट्रोल बाटल्या फेकण्याकरिता युवकांना चिथावणी देणारे मुख्य आरोपी शेख जावेद ऊर्फ डडोला व मोहम्मद नफीस हे घटनेनंतर शहरातून भूमिगत झाले होते.

शुक्रवारी घेतले आरोपींना ताब्यात
कळमनुरी पोलिसांनी शुक्रवारी (ता. सात) या आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यानंतर शनिवारी (ता.आठ) या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने या आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, सोमवारी (ता. दहा) आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी या आरोपींना हिंगोली येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाकडून आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर यांनी दिली आहे. 

किराणा दुकानात १५ हजारांची अवैध देशी दारू
कुरुंदा ः वसमत तालुक्‍यातील कुरुंदा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सेलू येथे एका किराणा दुकानातून अवैध देशी दारूच्या २८८ बॉटल जप्त करून रविवारी (ता. नऊ) गुन्हा दाखल केला आहे. कुरुंदा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सेलू येथे संदीप गलांडे यांच्या किराणा दुकानात सहा बॉक्‍समध्ये १४९७६ रुपये किमतीच्या २८८ बॉटल चोरटी विक्री करण्यासाठी त्‍याच्या ताब्यात बाळगूण असताना आढळून आला. त्‍याला गोविंद भोसले (रा. आंबाचोंडी) हा देशी दारूचा माल पुरवठा करत असल्याचे संदीप गलांडे यांनी सांगितले. या बाबत सहायक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवाड यांच्या फिर्यादीवरून संदीप गलांडे व त्‍याला दारूच्या बॉटल विक्री करणारा गोविंद भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com