लातूर जिल्ह्यात पंधरा वर्षांनंतर कापूस खरेदी केंद्र, जिल्हा प्रशासनाला यश

Latur District Cotton News
Latur District Cotton News

लातूर  : एकीकडे कोरोनाशी लढा देताना दुसरीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीचा प्रश्न जटिल होऊन बसला. गंगाखेड (जि.परभणी) केंद्रावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कापूस खरेदी होणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र केंद्रासाठी प्रयत्न सुरू केले. त्यात ग्रेडरची अडचण आली. कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यावर मात करण्यात आली. अशा चौफेर प्रयत्नांतून सोमवारी (ता. १८) जिल्ह्यात पानगाव (ता. रेणापूर) येथे पंधरा वर्षांनंतर कापूस खरेदी केंद्र सुरू झाले व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.


जिल्ह्यात नगदी पीक म्हणून पंधरा वर्षांपूर्वी शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करीत होते. सोयाबीन आल्यानंतर हे पीक मागे पडले. तरीही अहमदपूर व जळकोट तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य काही तालुक्यांत कापसाची लागवड केली जाते. पूर्वी एकाधिकार योजनेत कापूस खरेदी केली जात होती. जिल्ह्यात पंधरा वर्षांपूर्वी मोठ्या संख्येने खरेदी केंद्र सुरू होती. यामुळे जिनिंग व प्रेसिंग कारखानदारीचा व्यवसायही तेजीत आला होता. सोयाबीनमुळे कापसाचे उत्पादन घटले आणि एकाधिकार कापूस खरेदी योजनाही बंद पडली. खासगी व्यापारी; तसेच जिनिंग कारखानदारांकडून कापूस खरेदी सुरू झाली. यंदा अनेक वर्षांनंतर बाजारात कापसाचा भाव घसरला. बाजारात तीन हजार ८८० ते चार हजार रुपये प्रतिक्विंटल भाव सुरू आहे. तर हमीभाव पाच हजार २५५ रुपये क्विंटल आहे. यामुळे जिल्ह्यात खरेदी केंद्राच्या मागणीने जोर धरला.

सुरवातीला प्रशासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कापसाची गंगाखेड येथील केंद्रावर विक्री करण्यासाठी प्रयत्न केले; मात्र गंगाखेड बाजार समितीच्या सभापतींनी अगोदर स्थानिक शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी करून नंतरच बाहेरच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी करावी, अशी मागणी केली. तसे पत्रही त्यांनी प्रशासनाला दिले. गंगाखेडच्या केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या पाहता लातूरच्या शेतकऱ्यांची खरेदी होणे शक्य नव्हते. यामुळे जिल्ह्यात स्वतंत्र केंद्र सुरू करण्याशिवाय पर्याय नव्हता. पालकमंत्री अमित देशमुख व राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत ता. २८ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा होऊन महाराष्ट्र राज्य पणन महासंघाकडे नवीन खरेदी केंद्राचा प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय झाला.


अशी केली ग्रेडरची अडचण दूर
खरेदी केंद्राचा प्रस्ताव पाठविल्यानंतर ग्रेडरची (प्रतवारीकार) अडचण आली. यासाठी कृषी विभागातील दोन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय झाला. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी खास बाब म्हणून दोघांना नागपूर येथे प्रशिक्षणासाठी पाठविले. दोघेही प्रशिक्षण घेऊन परत आल्यानंतर केंद्राच्या उद्‍घाटनाचा मुहूर्त ठरला आणि सोमवारी केंद्राचे उद्‍घाटन झाले. केंद्रावर दोन दिवसांत ५५ शेतकऱ्यांचा एक हजार २४९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) समृत जाधव यांनी दिली.

सत्तरवर्षीय आजोबाची कोरोनावर यशस्वी मात; मधुमेह असूनही जिंकली लढाई

खरेदीसाठी २५ मेपर्यंत नोंदणी
जिल्ह्यातील चार हजार ३१४ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यात एकट्या अहमदपूर तालुक्यातील दोन हजार ७४७, तर जळकोट तालुक्यातील एक हजार ४८७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. उदगीरमधील ३८, रेणापूर- दोन, चाकूर- २९, लातूर- ९, तर देवणीतील दोन शेतकऱ्यांनीही नोंदणी केली आहे. कापूस विक्रीसाठी आणखी नोंदणी सुरू असून येत्या २५ मेपर्यंत सायंकाळी सहापर्यंत शेतकऱ्यांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdurgbXVOdg4yGLQC8EyiCiP1ez7DfDdsTviHDLqC2Lblgyhw/viewform?usp=sf_link या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक जाधव यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com