esakal | प्रदीर्घ खंडानंतर लोहाऱ्यात पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

तब्बल पंधरा दिवसांच्या खंडानंतर शहरासह तालुक्‍यातील बहुतांश भागांत शनिवारी (ता. 24) सायंकाळी जोरदार पाऊस झाला.

प्रदीर्घ खंडानंतर लोहाऱ्यात पाऊस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोहारा (जि.उस्मानाबाद) ः तब्बल पंधरा दिवसांच्या खंडानंतर शहरासह तालुक्‍यातील बहुतांश भागांत शनिवारी (ता. 24) सायंकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे माना टाकलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.


गतवर्षीच्या दुष्काळामुळे सर्वसामान्यांचे अर्थचक्र कोलमडले आहे. चालू हंगामात उभारी येईल, अशी अपेक्षा असताना यंदाही पाऊस हुलकावणी देत आहे. त्यामुळे पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच जेरीस आणले आहे. अद्यापही तालुक्‍यातील नदी, नाले वाहते होतील असा मोठा पाऊस झालेला नाही. यंदा तब्बल एक महिन्यानंतर पावसाचे आगमन झाले. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या होण्यास विलंब झाला. अधूनमधून झालेल्या रिमझिम पावसार पिके तग धरून होती; परंतु मागील पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिली. त्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने भरपावसाळ्यातही उन्हाळ्यासारखी स्थिती निर्माण झाल्याने बहरलेली पिके करपण्याच्या मार्गावर होती. हलक्‍या प्रतीच्या जमिनीवरील पिके करपली आहेत; परंतु शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रिमझिम पावसास सुरवात झाली. त्यानंतर मात्र पावसाचा जोर वाढला. रात्री नऊपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.

 
शहरासह तालुक्‍यातील मार्डी, बेंडकाळ, नागूर, कास्ती, नेगाव, भातागळी, खेड, मोघा, माळेगाव, हिप्परगा, धानुरी, माकणी या भागांत दमदार पाऊस झाला. तालुक्‍यातील दक्षिण भागातील जेवळी, पांढरी, भोसगा, अचलेर, आष्टा कासार, दस्तापूर या परिसरात हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. लोहारा महसूल मंडळात सर्वाधिक 40 मिलिमीटर, माकणी मंडळात 34, तर जेवळी मंडळात 14 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहेत. आत्तापर्यंत तालुक्‍यात सरासरी 373.33 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे.


सोयाबीन, उडीद, मूग आदी पिके फुलोऱ्यात होती; परंतु पावसाने दडी मारल्याने फुलोऱ्यातील पिकांनी माना टाकायला सुरवात केली. शनिवारी झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी बहुतांश क्षेत्रावरील पिकांचा फुलोरा गळून गेला आहे. त्यामुळे म्हणावे तशी फळधारणा होण्याची आशा मावळली. त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळणार नसल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे.

loading image
go to top