esakal | पुण्‍याहून आलेल्याच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांत भीती, ठेवले सुरक्षित अंतर

बोलून बातमी शोधा

Latur Crime News

मृतदेहाजवळ कोणीच जायला तयार होईना. अखेर पोलिसांच्या मदतीने आरोग्य यंत्रणेने मृतदेह उचलला. सर्वोपचार रुग्णालयात मंगळवारी (ता. १७) उत्तरीय तपासणीनंतर संबंधिताचा मृत्यू लिव्हर खराब होऊन हृदय बंद पडल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नातेवाइकांच्या उपस्थितीत पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.

पुण्‍याहून आलेल्याच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांत भीती, ठेवले सुरक्षित अंतर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : पुण्याहून पाच दिवसांपूर्वी रामेश्वर (रुई, ता. लातूर) येथे आलेल्या एकाचा सोमवारी (ता. १६) दुपारी मृत्यू झाला. कोरोनामुळेच हा मृत्यू झाल्याच्या संशयावरून रामेश्वरच्या ग्रामस्थांनी धसका घेतला. मृतदेहाजवळ कोणीच जायला तयार होईना. अखेर पोलिसांच्या मदतीने आरोग्य यंत्रणेने मृतदेह उचलला. सर्वोपचार रुग्णालयात मंगळवारी (ता. १७) उत्तरीय तपासणीनंतर संबंधिताचा मृत्यू लिव्हर खराब होऊन हृदय बंद पडल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नातेवाइकांच्या उपस्थितीत पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.


रामेश्वर येथील अनंत ज्ञानोबा कराड (वय ६०) हे पुण्याजवळील एका गावात कामाला होते. त्यांचे नातेवाईकही पुण्यातच आहेत. कराड हे अविवाहित असून, एका विवाहासाठी ते गुरुवारी (ता. १२) गावी आले होते. सोमवारी सकाळी ते जेवण करून घराबाहेर पडले. घरी परतल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांची आई याबाबतची माहिती ग्रामस्थांना देत असतानाच कराड यांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू झाल्याने मृतदेहाजवळ कोणीही जात नव्हते. याबाबत माहिती मिळताच पोलिसांना पाचारण करून एक पथक रामेश्वरला पाठविल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले. गातेगाव पोलिसांनी पंचनामा केला. पोलिस पाटील शरद पाटील यांच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली. आरोग्य विभागाच्या पथकाने मृतदेह विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आणला. आज उत्तरीय तपासणीनंतर लिव्हर खराब होऊन हृदय बंद पडल्याने कराड यांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले. त्यानंतर दुपारी मृतदेह रामेश्वरला नेण्यात आला. पुण्याहून आलेल्या नातेवाइकांच्या उपस्थितीत दुपारी कराड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले, असे पोलिस जमादार दामोदर सिरसाट यांनी सांगितले.

वाचा ः एकोप्याने काम करू अन् कोरोनाला पळवू, सुनील केंद्रेकरांना व्यक्त केला विश्वास

नमुने प्रयोगशाळेकडे
ताप आल्यानेच कराड यांचा मृत्यू झाल्याचे त्यांची आई सांगत होती. सतर्कता म्हणून आरोग्य विभागाने संबंधिताच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन पुण्यातील प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. बुधवारी (ता. १८) अहवाल येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी सांगितले.