...तोपर्यंत हातातील कोब्रा सोडलाच नाही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

कोब्रा जातीच्या सापाने एका युवकाला दंश केला. युवकाने तत्काळ त्या सापाचा पाठलाग करून पकडले. जिवंत साप हातात घेऊन दहा किलोमीटरचे अंतर पार केले.

नांदेड: कोब्रा जातीच्या सापाने एका युवकाला दंश केला. युवकाने तत्काळ त्या सापाचा पाठलाग करून पकडले. जिवंत साप हातात घेऊन दहा किलोमीटरचे अंतर पार केले. प्रवासादरम्यान साप वळवळत होता, पण रुग्णालयात पोहचेपर्यंत त्याला सोडलेच नाही. विशेष म्हणजे रुग्णालयात पोहचेपर्यंत तो बेशुद्ध पडला नाही. या युवकाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिलोली तालुक्यातील माचनूर रेतीघाटांवर कामावर असलेल्या बालाजी विठ्ठल पांचाळ (वय 25) हा आपल्या दोन मित्रांसह वाळूवर बसला होता़. त्यावेळी सापाने बालाजीला दंश केला. दंश केल्यानंतर साप दुसरीकडे निघाला. बालाजी त्याच अवस्थेत सापाचा पाठलाग करुन पकडले़. बालाजीच्या हातातील जीवंत साप पाहून मित्र घाबरले. परंतु, बालाजीने धीर धरत मित्राला दुचाकी घेवून रुग्णालयात येण्यास सांगितले़. बालाजीचा मित्र दुचाकी चालवत होता तर बालाजी जिवंत सापाला घेऊन मागे बसला होता. माचनूर ते बिलोली रुग्णालय असे दहा किलोमीटरचे अंतर पार केले. बालाजीने तोपर्यंत हाताली जीवंत साप सोडलाच नाही. रुग्णालयाजवळ गेल्यानंतर नागरिकांनी सापाला ठेचून मारले़. रुग्णालयात वैद्यकिय अधिक्षक डॉ. नागेश लखमावार यांनी प्राथमिक उपचार केले. पण, बालाजीची प्रकृती ढासळत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले.

दरम्यान, बालाजीच्या धाडसाचे कौतुक होत असून, त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After taking a bitten cobra, he traveled 10 km to the hospital at nanded