लातूरसाठी पुन्हा `वॉटर ट्रेन` पर्याय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

लातूर जिल्हयात २०१५ पेक्षा भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. शहराला यावेळी अधिक झळा पोहचणार आहेत. पाणी पुरवठा होणाऱ्या मांजरा धरणात अत्यल्प पाणी साठा आहे.

लातूर : लातूर जिल्हयात २०१५ पेक्षा भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. शहराला यावेळी अधिक झळा पोहचणार आहेत. पाणी पुरवठा होणाऱ्या मांजरा धरणात अत्यल्प पाणी साठा आहे. तसेच मांजरा धरणाच्या लाभक्षेत्रात पर्जन्यमान झालेले नाही. त्यामुळे शहराला पाणी पुरवठयात कपात करण्यात येत असून सप्टेंबरपासून महिन्यातून फक्त दोन वेळेस पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

तसेच लातूरला पाणी पुरवठा सुरळित होण्यासाठी वॉटर ट्रेनचाही पर्याय असून त्याची पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले हेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी जी. श्रीकांत यांनी टंचाईचा आढावा घेतला आहे. मांजरा धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे महापालिकेने शहराला सप्टेंबरमध्ये महिन्यातून दोनदा पाणी पुरवठा करावा. तसेच पुढील काळात पाऊस झाला नाही आणि धरणात पाणी उपलब्ध झाले नाही तर महापालिकेच्या पाणी पुरवठयात आणखी कपात करण्याचे नियोजन ठेवावे. लातूर शहराला पाणी पुरवठा सुरळित चालू ठेवण्यासाठी वॉटर ट्रेन आणावी लागणार आहे.

तसेच उस्मानाबाद येथून उजनीचे पाणी टँकरने आणणे व इतर सर्व पर्यायी पाणी पुरवठयाची व्यवस्था आणि नियोजन महापालिका व संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी करावे. महापालिका, महावितरण, पाणी पुरवठा विभाग यांनी रेल्वे ट्रेनसाठी जागेवर जाऊन पाहणी करावी, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले आहेत.

जिल्हयातील सर्व नगरपालिकांच्या पाणी पुरवठयामध्ये 15 टक्के पाणी कपात करावी.  महावितरणने टंचाईच्या काळात लातूर महापालिका तसेच इतर कोणत्याही पाणी पुरवठा योजनांचे विद्यूत कनेक्शन थकबाकीसाठी खंडित करु नये. या टंचाईच्या भीषण परिस्थितीमध्ये सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांनी टंचाईच्या कामांना सर्वोत्तम प्राधान्य दयावे. तसेच तहसिलदार व गट विकास अधिकाऱ्यांनी प्रत्येक आठवडयाला तलाठी व ग्रामसेवकांची टंचाईबाबत बैठक घेऊन टंचाईग्रस्त गावांची सविस्तर माहिती ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले.

सध्या जिल्हयातील 71 गावांमध्ये 72 टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरु आहे. जळकोट, अहमदपूर व शिरुर अनंतपाळ या तालुक्यामध्ये एक ही टँकर सुरु नाही. तसेच जिल्हयात टँकर व्यतिरिक्त 797 विंधन विहीर व विहिरींची अधिग्रहणे सुरु आहेत, अशी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी दिली. यावेळी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांचे अधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Again the water train as a option for Latur

टॅग्स