esakal | दुष्काळी परिस्थितीचा परिणाम, भाजीपाल्याची आवक घटली
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

दुष्काळी परिस्थितीचा परिणाम, भाजीपाल्याची आवक घटली

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद - तीन वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळ पडत आहे. यंदाही पाऊस नसल्यामुळे शेतमालावर मोठा परिणाम झाला आहे. येथील कृषी उत्पन्न बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक 50 टक्‍क्‍यांवर आली आहे; तर नवीन धान्यही बाजारात येणे बंद झाले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ई-नाम प्रणालीचाही यावर परिणाम झाला आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 2017 मध्ये ई-नाम प्रणाली लागू करण्यात आली. या प्रणालीमुळे औरंगाबाद बाजार समितीत येणारा शेतमाल इतर बाजार समितीकडे वळला आहे. यानंतर सतत पडत असलेल्या दुष्काळामुळे बाजार समितीतील धान्य बाजाराची सर्व उलाढाल ठप्प पडली आहे. काही तुरळक जुने धान्य विक्रीसाठी येत आहे; पण त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. बाजार समिती ऑगस्टच्या शेवटी नवीन मुगाची आवक सुरू होते; मात्र यंदा मुगाचे व प्रमाण कमी असल्यामुळे दिवसाकाठी दोन ते चार गोण्या विक्रीसाठी येत आहेत. दरम्यान, यंदा भाजीपाल्याचीही आवकही घटली आहे. जोही भाजीपाला येत आहे त्यात विदर्भ, खानदेश आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील वाटा मोठा आहे. 
 
औरंगाबादऐवजी इतर ठिकाणी पसंती 
औरंगाबाद बाजार समितीत सप्टेंबर 2017 ते जून 2019 पर्यंत गेट इंट्रीद्वारे 2 लाख 25 हजार 542 क्विंटल धान्याची नोंद झाली. त्यातील 8,590 क्विंटल धान्याचे ई ऑक्‍शन झाले. त्यानुसार 1,057 लॉट पडले. त्यातून 29 लाख 30 हजार रुपयांचे ई-पेमेंट झाले आहे. ई-नाममुळे आलेले धान्य शेतकरी जालना, लासूर स्टेशन, फुलंब्री व इतर ठिकाणी विक्रीस नेत आहेत. 
 
बाजार समितीला फटका 
गतवर्षी मराठवाड्यात भीषण दुष्काळ होता. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या हातात कोणतेच पीक आले नाही. तीच परिस्थिती यंदाही आहे. परिणामी, औरंगाबाद बाजार समितीची 2018 मध्ये तब्बल 1 लाख 8 हजार क्विंटल धान्यांची आवक घटली. त्यामुळे बाजार समितीला 22 कोटी 81 लाख रुपयांचा फटका बसला आहे. 
 
सध्या फक्त एंट्री 
दुष्काळाने बाजार समितीतील धान्याची आवक जवळपास संपली आहे. चालू वर्ष 2019 मधील खरीप हंगामातील शेतमाल ऑक्‍टोबर महिन्यानंतर बाजारात येण्यास सुरवात होईल. तोपर्यंत बाजार समितीत धान्याची आवक होणार नाही. त्यामुळे ई-नाम प्रणाली बंद आहे. आवक असले तरच ई-नाम सुरू राहील. सध्या फक्त गेट इंट्री सुरू आहेत. 

2018-19 महिना निहाय ई-नाम आवक
आवक 21,230
एकूण लॉट 3,783
असेईंग लॉट 2,582
ई-लिलाव खरेदी-विक्री 1,022
ई-पेमेंट

29,21,402


 
 
 

बाजार समितीत दुष्काळामुळे भाजीपाल्याची आवक 50 टक्के कमी झाली आहे. बाजार समितीत प्रामुख्याने प्रामुख्याने फुलंब्री, करमाड, औरंगाबाद तालुका याच परिसरातून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला विक्रीसाठी येतो; मात्र यंदा पाऊस नसल्यामुळे येथील भाजीपाला उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. धान्यामध्ये जुन्या ज्वारी आणि नवीन मुगाची आवक काही प्रमाणात सुरू झाली आहे; पण ती अत्यल्प आहे. ई नाममुळे बाजार समितीच्या धान्य मार्केटला मोठा फटका बसला आहे. 
- दिलीप गांधी, अडत व्यापारी बाजार समिती 
 
बाजार समितीत मागील सात महिन्यांपासून ई-नाम बंद आहे. ई-नाममुळे शेतकरी जवळच्या बाजार समितीत माल विक्रीसाठी निल्याने समितील आवक 60 टक्‍क्‍यांनी घटली. त्यातच यंदा दुष्काळाने होती नव्हती ती कसर पूर्ण केली. त्यामुळे मागील नोव्हेंबरपासून ई-नाम बंद आहे. गेल्याने मागील पाच महिन्यांपासून समितीत धान्याची आवक अत्यल्प होत आहे. रोज 8 ते 10 गोण्या धान्य विक्रीसाठी येत असल्याने व्यापारी बसून आहेत. दुष्काळामुळे व्यापाऱ्यांकडेही काम उरलेले नाही. 
- कन्हैयालाल जैस्वाल, अध्यक्ष, अडत व्यापारी असोसिएशन 
 

loading image
go to top