स्वतःला औताला जुंपून उरकली खरिपाची पेरणी!

सुरेश पवार
रविवार, 7 जुलै 2019

‘हे दिवसही बदलतील’
दुष्काळामुळे शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी झाले. चाऱ्याचे भाव देखील आकाशाला भिडल्यामुळे तो खरेदी करणेही कठीण झाले आहे. या परिस्थितीत जनावरे कशी सांभाळावीत, असा प्रश्न आहे. असे असले तरी हे दिवस देखील बदलतील, असा आशावाद नंदकुमार परडे यांनी व्यक्त केला.

हट्टा (ता. वसमत, जि. हिंगोली) - मागील दोन वर्षांपासूनच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हतबल आहेत. त्यातच यंदाही जुलैच्या पहिला आठवडा सरला तरी सर्वदूर पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणी करावी कधी, याची विवंचना आहे. नाना प्रश्‍न, समस्यांची मालिका संपता संपत नसल्याने चौकटीबाहेर जाऊन शेतकऱ्यांना विचार करावा लागत आहे.

असाच विचार येथील परडे कुटुंबीयांनी केलाय. पेरणीसाठी लागणाऱ्या बैलजोडीसाठी वारंवार हात कोणाकडे पसरायचे, हा विचार करून बापलेकाने स्वतःला औताला जुंपून पेरणी पूर्ण केली. चांगला पाऊस व्हावा, शिवार फुलावे आणि फरपट थांबावी, अशीच त्यांची अपेक्षा आहे.

अल्पभूधारक शेतकरी नंदू गंगाराम परडे, पांडुरंग गंगाराम परडे, सटवाजी गंगाराम परडे या तीन भावंडांना प्रत्येकी पावणेदोन एकर शेती आहे. शेतीसोबतच माठ तयार करणे, गणेश, दुर्गादेवीच्या मूर्ती तयार करून विक्री करणे हा व्यवसाय देखील ते करतात; मात्र मागील तीन ते चार वर्षांपूर्वी ही भावंडे वेगळी झाल्याने त्यांना बैलजोडी परवडत नव्हती. त्यामुळे ती विकली. यातील नंदकुमार परडे यांना तीन मुले. सुना, नातवंडे असा पंधरा जणांचा परिवार आहे. पावणेदोन एकर शेतीमध्ये फार काही उत्पन्न मिळत नसल्यामुळे मूर्ती, माठ तयार करून परभणी, वसमत येथे विक्री करणे यावरच ते भर देतात. यातून त्यांना वर्षाकाठी एक लाख रुपये मिळतात; तर शेतीमधून थोडेफार उत्पन्न मिळते. यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. आता समाधानकारक पाऊस नसला तरी खरीप हंगाम सुरू झालाय.

गावातील इतर शेतकऱ्यांकडे बैल मागून पेरणी करण्यावर अनेक शेतकरी भर देतात; मात्र दुष्काळी परिस्थितीमध्ये बैल सांभाळणे कठीण झाल्याने ओळखीच्या शेतकऱ्यांनी बैलांची विक्री केली. त्यामुळे आता बैलजोडी कुणाकडे मागावी, पेरणी कशी करावी, याची चिंता नंदकुमार परडे यांना होती.

अखेर त्यांनी या स्थितीवर मात करीत श्री. परडे यांनी स्वतःसह भाऊ पांडुरंग, मुलगा जगदीश याला सोबत घेऊन पेरणी सुरू केली. आळीपाळीने दोघांनी औत खांद्यावर घेतले, तर नंदकुमार परडे यांच्या पत्नी जानकाबाई परडे यांनी पेरणीची बाजू सांभाळली. या पद्धतीने त्यांनी दोन दिवसांत पावणेदोन एकरांत सोयाबीन पेरले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture Kharip Cultivation Nandkumar Parade and Jagdish Parade