मराठवाड्यातील सोयगाव तालुक्यात रुजतोय अळू

मराठवाड्यातील सोयगाव तालुक्यात रुजतोय अळू

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकरी कंदांची विक्री व त्यायोगे उत्पन्न मिळविण्यासाठी अळूच्या शेतीकडे वळले आहेत. साधारण सहा महिन्यांचे हे पीक एकरी १०० क्विंटलपर्यंत उत्पादन त्यांना मिळवून देत आहे. कमी उत्पादन खर्चात क्विंटलला १५०० रुपयांपासून ते २४०० रुपये दर त्यांना मिळतो आहे. हळद, आले किंवा अन्य नगदी फळपिकांच्या तुलनेत हे पीक फायदेशीर ठरत असल्याचे त्यांचे अनुभव आहेत. 

अळूची भाजी किंवा वडी हा अत्यंत आवडीचा पदार्थ म्हणून खाल्ला जातो. अनेकांच्या परसबागेतही अळूची मोजकी झाडे दिसून येतात. अळूचे देठ व कंददेखील खाण्यासाठी उपयोगात  आणले जातात. विशेषतः कोकणात प्रत्येकाच्या परसबागेमध्ये किंवा नारळ- सुपारीच्या बागेत अळू दिसून येतो. भाजीचा किंवा वडीसाठीचा असे अळूचे विविध प्रकार आहेत. मराठवाड्यातील सोयगाव तालुक्यात या अळूची शेती हळूहळू रुजताना दिसू लागली आहे. 

सोयगाव भागात अळूची शेती 
औरंगाबाद जिल्ह्यात सोयगाव तालुक्यातील किन्ही, वडगाव, गोंदेगाव, पळशी, शेलगाव, सोयगाव, फर्दापूर, बनोटी, दस्तापूर आदी गावांमध्ये अळू पिकाने चांगले मूळ धरले आहे. या गावात सुमारे २३८ एकरांपर्यंत क्षेत्र या पिकाखाली असावे. पैकी सर्वांत जास्त म्हणजे २०० एकर क्षेत्र किन्ही या एका गावात असावे. 

शेतकऱ्यांचे अनुभव
सोयगाव तालुक्यातील किन्ही येथील तातेराव बळीराम वाडेकर यांच्याकडे सुमारे तीन ते पाच एकरांवर अळूचे क्षेत्र असते. या पिकाचा काही वर्षांपासूनचा त्यांचा अनुभव आहे. ते म्हणाले, की मध्य प्रदेशात डाळिंबाची शेती पाहण्यासाठी गेलो असता तेथे हे पीक पाहण्यास मिळाले. तेथे या पिकाला आरवी (हिंदी नाव) नावाने संबोधले जाते. त्याविषयी अधिक माहिती घेतली. त्याचे अर्थकारण, बाजारपेठ याविषयी अभ्यास केला. त्यानंतर त्याचा प्रयोग करायचा ठरवले. हे पीक आर्थिकदृष्ट्या परवडते असे लक्षात आले आहे. सुमारे सहा महिन्यांचे हे पीक आहे. साडेआठ क्विंटल बेणे एका एकरसाठी लागते. एकरी सुमारे १०० क्विंटलपर्यंत त्याचे उत्पादन मिळते. 

पवार यांचा अनुभव
सोयगाव तालुक्यातील दस्तापूर येथील किशोर पवार हे स्वतः शेतकरी व व्यापारीदेखील आहेत.  व्यापाराच्या निमित्ताने मध्य प्रदेशातील खांडवा या शहराशी पवार सारखा संपर्क असतो. या परिसरातच त्यांना अळूचे पीक दिसून आले. उत्तर भारतात त्याचे कंद आवडीने खाल्ले जातात.   तेथील  शेतकऱ्यासाठी हे पीक उत्पन्नाचे चांगले साधन आहे ते त्यांना उमगले. ते स्वतः अळू घेतातच. शिवाय ते स्थानिक शेतकऱ्यांकडूनही कंद खरेदी करतात व पुढे अन्य व्यापाऱ्यांना विकतात. मध्य प्रदेशात याची शेती होत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या गावात सुमारे १० ते १२ शेतकरी या पिकाच्या शेतीत गुंतल्याचे ते म्हणाले. 

विक्री व बाजारपेठ 
वाडेकर म्हणाले, की आमच्या गावात सुमारे ५० शेतकरी या पिकाची शेती करीत आहेत. या पिकाच्या कंदांची विक्री केली जाते. क्विंटलला ७०० रुपयांपासून ते १५००, २३००, कमाल २८०० रुपयांपर्यंत दर मिळाले आहेत. यासाठी स्थानिक व्यापारी आहेत. ते दरवर्षी कंद खरेदी करतात. मुंबई- वाशी मार्केटलाही या कंदांना चांगली मागणी आहे. तेथेही एकेवेळी क्विंटलला १६०० रुपये दराने कंदांची विक्री केल्याचे त्यांनी सांगितले. वाडेकर व पवार यांच्या म्हणण्यानुसार या पिकाचा उत्पादन खर्च एकरी ४० हजार रुपयांपर्यंत असतो. बेणे म्हणून याच्या कंदांचा दर क्विंटलला साधारण २२०० रुपये असतो. आले, हळद आदी नगदी पिकांचा कालावधी, त्यांचे दर आदींचा विचार केल्यास हे पीक किफायतशीर होत असल्याचे हे शेतकरी सांगतात. य पिकाला किडी-रोगांच्या समस्याही कमी आहेत. शेणखताचा वापर केल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते, असेही शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. 

 पाणी मात्र अत्यंत आवश्‍यक 
हे पीक यशस्वी करायचे तर त्याला पाण्याची संरक्षित व्यवस्था मात्र लागतेच असे वाडेकर यांनी सांगितले.एक दिवसाआड त्याला पाणी द्यावे लागते. पाण्याचा थोडा जरी खंड पडला तरी पाने सुकण्यास सुरवात होतात. उत्पादनावर परिणाम होऊ लागतो. जूनमध्ये हे पीक घेतले जात असल्याने पावसाळ्यात पाण्याची तशी समस्या येत नाही. आमचा भाग खानदेशच्या सीमेजवळ आहे. पाण्याच्या स्राेतांचाही फारसा अडसर जाणवत नसल्याचे वाडकर यांनी सांगितले.   

अळूविषयी ठळक बाबी 
   सुरवातीच्या काळात तणमुक्त ठेवावे लागते. झाडाचा विस्तार झाला की सावलीमुळे पुढे तणांची वाढ होत नाही. 
   पक्वतेवेळी सर्व पाने सुकून जातात. कंदाला कोणतीही इजा न होता कुदळीने कंदांची काढणी होते. मजुरामार्फत वेचून हे कंद पोत्यात भरले जातात. पाणी लागल्यानंतर कंद सडतो असे शेतकरी सांगतात. त्यामुळे ते पाण्याने धुतले जात नाहीत.
   खांडवा भागात ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये आरवीची लागवड होते. काढणी मे-जूनच्या दरम्यान होते.
   अळूची पाने व कंदांपासून विविध अन्नपदार्थ तयार केले जातात.
   कंदाचा गर पिठूळ असून त्याला चांगला स्वाद असतो. 
   उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेशांत कंद शिजवून साल काढली जाते. तुकडे करून किंवा तो बारीक मळून तेलामध्ये मोहरी, हिरवी मिरची यांची फोडणी देऊन भाजी केली जाते. सिंधी लोक याची भाजी आवडीने खातात. कंदामध्ये मुगाची डाळ मिसळून त्याची उत्तम भाजी ते तयार करतात. 
   महाराष्ट्र व गुजरातमध्ये अळूच्या पानाच्या वड्या प्रसिद्ध आहेत. कोकणात अळूच्या पानाची पातळ भाजी तयार करतात. त्याला अळूचे फदफदे म्हणतात.

तज्ज्ञ काय म्हणतात?
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत वाकवली संशोधन केंद्रातील सहायक प्राध्यापक (फलोत्पादन) डॉ. प्रज्ञा गुढे म्हणाल्या, की भाजी व वडीचा असे अळूचे प्रकार आहेत. त्याचे कंदही उपयोगात येतात. हिंदी भाषेत अळूला आरवी असे म्हणतात. हे एक कंदपीक असून कंदांपासूनच त्याची वृद्धी होते. हे पीक महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात येऊ शकते. मात्र त्याला पाण्याची भरपूर गरज भासते. दलदल किंवा पाणथळ भागात अळू चांगला येतो. खरिपात त्याची लागवड होते. आॅक्टोबरमध्येही त्याची लागवड करता येते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत वाकवली येथील संशोधन केंद्रात कंदपिकांवर संशोधन चालते. येथे अळूचे दोन ते तीन शिफारसीत वाण पाहण्यास मिळतात. त्याचबरोबर त्याचे ४० प्रकारचे जर्मप्लास्मही उपलब्ध आहेत. त्रिवेंद्रम (केरळ) येथील  कंदवर्गीय संशोधन केंद्रात त्याविषयी भरपूर संशोधन झाले आहे. 

 (लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.) 
 : तातेराव वाडेकर, ९७६५६८८५८५
 : किशोर पवार, ८००७७८८८५३
 : डॉ. प्रज्ञा गुढे, ९४२०१२८६०३.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com