विद्रोहाला देऊया विवेकाची जोड! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akhil bharatiya marathi sahitya sammelan 2022 Conspiracy to end the language

सोळाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन शनिवारी उदगीर येथे झाले. अध्यक्ष गणेश विसपुते यांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादीत अंश...

विद्रोहाला देऊया विवेकाची जोड!

विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या बोधचिन्हातच समतेला होकार, विषमतेला नकार हे सूत्र आहे. वर्चस्ववाद, पुरुषसत्ताकवाद, भांडवली मूल्यं यांच्या विरोधात ही सांस्कृतिक चळवळ आहे. महात्मा फुल्यांनी साहित्य संमेलनाबाबत ‘त्यात अखिल मानवाचे हित सापडत नाही’ असं म्हटलं होतं, त्यात त्यांना त्याकाळात जी सबळ कारणं दिसली होती, तीच आताही मौजुद आहेत. समाजातल्या विविध स्तरांना, भाषा-बोलींना, जाती-जमातींना व्यापकपणे सामावून घेतलं पाहिजे. दुही आणि बेकीला विरोध, एकसूरी अभिव्यक्तीला नाकारणं यासाठी दलित, भटके विमुक्त, आदिवासी, कष्टकरी आणि स्त्रिया या सगळ्यांचे आवाज उमटवण्यासाठी वेगवेगळी संमेलनं गरजेची आहेत. आजचा काळ पाहाता मूलभूत मानवी मूल्यं, लोकशाहीची पायाभूत तत्त्वं आणि कल्याणकारी राज्याची कल्पना यांच्या चिंध्या-धांदोट्या होताहेत. हे सगळं बोलण्याचा अवकाशही आज संकोचत असतांना बोलण्याची संधी मला मिळत आहे.

लोकशाहीची पायाभूत मूल्यं आणि संविधानातले निर्देश दिवसाढवळ्या पायदळी तुडवले जाताहेत. दडपशाही आणि सेन्सॉरशिपचं भय इतकं वाढवलं गेलं आहे की सार्वजनिक शैक्षणिक संस्थांमधील अधिकारीवर्ग स्वतःहूनच रांगायला तयार आहे. देशातली संपत्ती केवळ दोन-चार लोकांच्याच हातात असावी असे प्रयत्न होत आहेत की काय अशा संशयाला जागा आहे. भूक, बेरोजगारी, महागाई या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. शिक्षणाचा पूर्ण विध्वंस करण्याचं व्रत घेतल्यासारखं दिसतं. महासाथीनं लक्षावधी माणसं मेली त्याहूनही अधिक मेली ब्रेकिंग न्यूजच्या फवाऱ्यानं, तुघलकी फर्मानांनी, टाळं लावून ठेवलेल्या गोदामांमुळे आणि अडवून ठेवलेल्या उपचारांमुळे.

हंगर नावाची शॉर्टफिल्म आहे. त्यात ओंगळ ढेरपोट्या दाखवला आहे. तो वस्तू खात सुटलेला आहे. तो पाशवी रीतीनं टेबलावरचे खाद्यपदार्थ खातो, टेबल खातो, अन्न देणाऱ्या मुलीला खातो. तसेच आता खा-खा सुटलेले प्राणी जमिनी खाताहेत, सामान्यांच्या बचती खाताहेत, शेतकऱ्यांच्या विम्याचे पैसे खाताहेत, जंगलं खाताहेत, आदिवासींना लुटून खाताहेत, पैसे तर खात आहेतच, माणसं खाताहेत, निसर्ग ओरबाडून अधाशासारखा खाताहेत. जे जे दिसेल ते ओरबाडत खात राहाणं हीच अमानुष क्रिया फक्त करण्यासाठी आपण जन्मलो आहोत असं समजून हे चाललेलं आहे.

कल्याणकारी राज्याचा ध्वंस

आजच्या काळात राष्ट्रवाद आणि भांडवलवाद हे परस्परांशी घट्टपणे संबंधित आहेत. भांडवलशाहीसाठी राष्ट्रवाद साधन आहे आणि ते त्याचं फलितदेखील आहे. बाजारी भांडवलशाही आणि राष्ट्रवाद ही हातात हात घातलेलीच भावंडं आहेत. जगभरात आज भांडवलशाही व्यवस्थांचा जोर वाढला आहे. भांडवली लोकशाहीतल्या संस्था आहेत, पण त्या सर्वंकषवादी सत्तांच्या हातातल्या कळसुत्री बाहुल्या बनल्या आहेत. एक मोठा वर्ग आहे जो दिसत नाही. जो बहुसंख्य आहे आणि त्याची मतं विचारली जात नाहीत. ती माध्यमांपर्यंत पोहोचतही नाहीत. पण तो या बदललेल्या झगमगाटी खोट्या ‘विकासा’ची झळ पोहोचलेला आहे.

भाषा संपवण्याचं कारस्थान

तंत्रज्ञानाला सपाटीकरण पाहिजे असतं. जगभर जागतिकीकरणाच्या सोयीसाठी एकच भाषा असणं आवश्यक ठरतं. व्यापार, उद्योग, नफ्यासाठी ते सोयीचं असतं. म्हणून हजारो भाषा संपवण्याचं पद्धतशीर कारस्थान रचलं जातंय. सुरुवातीला अंक इंग्रजीत शिकण्याचा आग्रह धरला जातो. मग स्थानिक भाषेत इंग्रजी शब्द वापरात वाढवत नेण्याच्या पद्धती अंमलात येतात. तशा जाहिराती लिहिल्या जातात. अख्ख्या वाक्यात एखाद-दुसराच स्थानिक शब्द वापरण्याची सवय लावली जाते. मग जगण्याची शैलीपण तशीच होऊन जाते. भाषेचं हे क्रिओलायझेशन-हळूहळू ती भाषा नष्ट करत नेतं. स्वैपाकघरातले, शेतीतले, ग्रामीण संस्कृतीतले स्थानिक भाषेतले शब्द कमी-कमी होत जातात.

विद्रोहाची गरज

आपल्याला विद्रोह करावा लागेल. प्रस्थापित किंवा प्रतिष्ठापना केलेल्या असत्याला सत्यानं ललकारणं, आव्हान देणं, प्रश्न विचारणं म्हणजे विद्रोह. असा विद्रोह ज्ञानेश्वरांनी केला होता, तुकोबांनी, बसवेश्वरांनी, जनाबाईंनी, कोपर्निकसनं, गॅलिलिओनं आणि अनेकांनी केला होता. अविवेकाचा प्रादुर्भाव आता उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीयांपुरताच सीमित नसून तो इतर जातींमधल्या वर्गापर्यंतही पोहोचलेला आहे. या बहुजन जातीतलेही आता अविवेकाचे समर्थक झाल्याचे दिसते. प्रगतीशील म्हणवले जाणारे वेगवेगळे समूह चिरफाळलेले आहेत. कम्युनिस्ट, समाजवादी, दलित या सगळ्यांच्या अस्मिता टोकदार झाल्यानं जोतिबा फुल्यांच्या कल्पनेतला एकमय लोक कसा निर्माण होणार?

अशा परिस्थितीत काय करायचं? महात्मा जोतिबा फुले यांच्यापासून वि. रा. शिंदे., डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कॉ. शरद पाटलांपर्यंत अनेकांनी आपल्याला यावरचा उतारा सुचवलेला आहे. तो आजही प्रस्तुत आहे. जोतिबा फुले म्हणतात त्याप्रमाणे शूद्रातिशूद्र, स्त्री आणि आदिवासी अशा सर्व समुदायांचं अब्राह्मणी तत्वज्ञानाने प्रबोधन करणे हाच इलाज आहे. हे करतांना त्यात एक अशा धर्मनिरपेक्षतेची आपल्याला आवश्यकता आहे जी वर्गविरोधी तर असेलच, पण ती भारतीय संदर्भात मुख्यतः जातविरोधी आणि स्त्रियांच्या हक्काचा हिरीरीनं विचार करणारीही असेल.

जोतिबांनी आपला वैकल्पिक संस्कृती उभारणीचा प्रकल्प मांडला त्या आधुनिक विचारात परंपरेतील सत्वशील तत्त्वं आणि नवतेचा स्वीकार केलेला दिसतो. त्यांच्या या अब्राह्मणी आधुनिकतेचा विचार म्हणूनच आजच्या काळातही तितकाच प्रस्तुत आणि सार्थ आहे. जमातवाद हा जातीय आणि धार्मिक अस्मितेला खतपाणी घालून आपला मतलब साधतो हे त्यांनी जाणलेलं होतं. त्यामुळे आजच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाला तोंड देण्यासाठी त्यांनी जे नेमकं सर्वसमावेशक पर्यायी ठोस प्रारूप उपलब्ध करून दिलेलं आहे, त्यावरूनच आपल्याला संघर्षाची दिशा ठरवावी लागेल. त्याच्यासाठी परस्परांतील कलह, जाती-जातीच्या टोकदार अस्मिता, फालतू अहंगंड विसरून, वेगवेगळ्या दिशेला झालेली तोंडं सामोरी करून खुलेपणा स्वीकारला पाहिजे. सद्यकालीन मोठे धोके ओळखून कॉ. पानसरेंनी सांगितलेल्या शत्रुमित्र विवेकाचं भान ठेऊन आपल्याला साथीनं उभं राहाणं आवश्यक आहे. त्यासाठी काटेकोरपणे कार्यक्रम ठरवावा लागेल. आताचे संकट सभ्यतेवरचं संकट आहे. माणूस केंद्रस्थानी ठेवून विवेकी विचारांनी वर्चस्ववादाला प्रतिवर्चस्ववादी चळवळीचा कार्यक्रम आखूनच मुकाबला करता येणार आहे. त्यासाठी प्रगतीशील विचारांतल्या अस्मितेच्या मुद्यांवरून चिरफाळलेल्या समूहांनी एकत्र येऊनच विचार करावा लागेल. अन्यथा अस्तित्वाच्या कडेलोटाची वेळ येईल.

Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2022 Conspiracy To End The Language

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top